ताजमहाल हे शिवमंदीर 'तेजोमहालय' नाही हे Archeological survey of India नेच मान्य केले हे बरे झाले. त्यातही केंद्रात भाजपा असताना,मोदी पंतप्रधान असताना आणि सरकारचा इतर क्षेत्रात हस्तक्षेप होतो हे आरोप होत असताना ASI ने हे मान्य केले हे द्विअर्थी उपयोगाचे.एक म्हणजे केंद्र अशा संस्थात फार ढवळाढवळ करत नाही असे यातून ध्वनीत होते. दुसरे म्हणजे सरकार कुणाचेही असले तरी इतिहासात नसलेल्या गोष्टींना सत्यात आणणे शक्य नसते याचा पुनरुवाच.
खरंतर आपल्या पत्नीच्या, अर्जुमंद बानो बेगम च्या स्मरणार्थ शाहजहानाने ही वास्तू बांधली. शाहजहान जेव्हा शाहजदा खुर्रम होता,तेव्हाचे त्याचे आणि अर्जुमंदचे प्रेम.जहाँगीर बादशहा होता तेव्हा. त्यावर नुरजहाँ,खुर्रम आणि वजीर असिफखान यांचा विशेष प्रभाव.विशेषतः जहाँगीरच्या उत्तर काळात मुघलांचे सत्ताकारण यांच्या हातातले बाहुले. अशावेळी नुरजहाँच्या पहिल्या नवऱ्याची,शेर अफगाणची मुलगी लाडली बानो आणि खुर्रमचा विवाह व्हावा हा तिचा हेतू.
प्रत्यक्षात मात्र खुर्रमची प्रेयसी अर्जुमंद असिफखानची मुलगी. पुढे त्यांचेच लग्न झाले,याचा राग म्हणून लाडली बानोचे लग्न नुरजहाँने शाहियारशी करून दिले.शाहियार हा कर्तृत्वशुन्य, विलासी शहजादा.त्याला बादशहा करून सत्तेची दोरी आपल्या हातात राहील ही नुरजहाँची अटकळ.पुढे राजकारणाने वेगळे वळण घेतले आणि खुर्रम बादशहा झाला,असिफखानने जावयाला प्रचंड मदत केली.(याविषयी सविस्तर लिहीन एकदा.)दरम्यान खुर्रमचा शाहजहान झाला होता आणि अर्जुमंदची मुमताज उल झमानी.
बुऱ्हाणपूरच्या शाहजहानच्या स्वारीवेळी बाळंपणात मुमताज गेली. त्यानंतर तिच्यासाठी बांधलेला हा ताज-महाल.तैमुरच्या वंशातील सर्व वैशिष्ट्य एकत्र करून बांधलेला.
आता ASI नेच कान टोचले हे बरं झालं. UNESCO ने वारसा यादीत नोंदवलेलीही वास्तू आता तरी वादग्रस्ततेच्या कचाट्यातून सुटेल अशी आशा आहे.©
http://m.timesofindia.com/city/agra/for-the-first-time-asi-tells-court-taj-is-not-a-temple-but-a-tomb/articleshow/60224065.cms