आलम लेखक आणि कवीवर्गाने चंद्रावर जितका अन्याय केला आहे तितका आजपर्यंत चंद्रावर गेलेल्या अंतरळवीरांनीदेखील नाही केला.चंद्र हा स्त्री की पुरुष यावरच खरा संभ्रम आहे. म्हणजे बघा,
'ये चांद सा रोशन चेहरा'( एस. एच. बिहारी) किंवा 'चौदहवी का चांद हो'(शकील बदयुनी) सारख्या गाण्यांत चंद्राची तुलना प्रेयसीच्या चेहऱ्याशी कवी करतो. तर 'चांद मेरा दिल (मजरूह सुलतानपुरी),गली में आज चांद निकला' (आनंद बक्षी)यात चंद्राला पुरुषपणा चिकटवला. त्यामुळे चंद्र हा नवरंगच्या 'अरे जा रे हटे नटखट...' मधला वेष घेऊन अवकाशात वावरत असावा असं मला अनेकदा वाटतं.
गदिमांसारख्या सारस्वताने 'सावळा गं रामचंद्र,रत्नमंचकी झोपतो,त्याला पाहता लाजून,चंद्र आभाळी लोपतो' मध्ये चंद्राची तुलना श्रीरामाच्या मुखकमलाशी केली,माउलींनी पसायदानात डाग नसलेला, अलांच्छन चंद्रमा मागितला. तर '...शाळा चांदोबा गुरुजींची' सारख्या बालगीताने चंद्राला मास्तर केले.याउपर 'चांदोबा चांदोबा भागलास का? ' किंवा
'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई..'ने त्याच्याशी मामाचं नातं जोडलं.
सगळ्यात जास्त moods चं variation उर्दू शायर लोकांनी दाखवलं !इब्न-ए-इंशाचं,
'कल चौदहवी की रात थी,
शब भर रहा चर्चा तेरा,
कुछ ने कहां ये चांद हैं,
कुछ ने कहां चेहरा तेरा । 'मधला romance असो किंवा
परवीन शाकिरचं,
'इतने घने बादल के पीछे
कितना तन्हा होगा चाँद '
मधलं काळजाला भिडणारे एकाकीपण असो,वा
'चाँद का हुस्न भी ज़मीन से है ,चाँद पर चाँदनी नहीं होती |' इब्न-ए-सफीच्या या शेर मध्ये व्यक्त होणारं pride असो.
चंद्र सगळीकडे आहे.बाल्य, तारुण्य आणि वृद्धत्व या तीन कोपऱ्यात चार पुरूषार्थ व्यापून उरणारा चंद्र मोठा की celestial entity असलेल्या एका निर्जव उपग्रहाला सजीवत्व देणारे साहित्यिक मोठे ? हा न सुटणारा प्रश्न आहे तो तसाच न सोडवता राहू दिलेला बरा.