Friday, 18 March 2016

असंपादकांचे संपादकीय

   
   मदर तेरेसा यांचा संतपदाचा मार्ग आता प्रशस्त झाला,ख्रिस्ती धर्मपरंपरेप्रमाणे दोन चमत्कार नावावर असल्याशिवाय संतपद मिळत नाही.नेमक्या याच विषयावर परवा(दि.१७ मार्च) लोकसत्तात ‘असंताचे संत’ नावाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला.उत्तम अग्रलेखनासाठी लागणारे सर्व गुणवैशिष्ट्ये त्यात  होते,तरीदेखील काल अचानक “क्षमस्व,आमच्या संपादकीयमुळे काही लोकांच्या भावना दुखावल्याने आम्ही ते मागे घेत आहोत” अशी दिलगिरी व्यक्त केली गेली.मुळात लोकसत्ता न वाचणारे आणि लोकसत्ताची मते न पटणाऱ्या अनेकांनी त्यांची हुर्यो केली,“संपादकीय मागे घेतात का कुठे?”असे म्हणत कुबेरांना पळपुटावैगेरे देखील टीका झाली.प्रत्येकाच्या विरोधाला आपआपली कारणे आहेत,पण सगळ प्रकरण एकदा शांतपणे पाहिलं कि आपला विरोध नक्की कुणाला असायला हवा हे स्पष्ट होईल.
        लोकसत्ता अनेकदा टोकदार अग्रलेख लिहितो,आपल्या भूमिका निर्भीडपणे,कुठल्याही राजकीय दबावाला न झुकता आणि त्याचा आपल्या खपावर काय परिणाम होईल याचा विचार न करता मांडतो.किंबहुना मराठीत ‘अग्रलेख’ म्हणावा असं हे एकमेव वृत्तपत्र.(सामना हे शिवसेनेचं ‘मुखपत्र’ आहे)आपल्या ९०० शब्दांच्या अग्रलेखात लोकसत्ता कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही.मग ‘बळीराजाची बोंब’ मधून शेतकर्यांमधल्या वाईट प्रवृत्तींवर टीका करणे असो किंवा ‘छगन सदन तेजोमय’ मधून भुजबळांची वाभाडी काढणे असो.याकुब मेननच्या फाशीचा त्यांनी केलेला विरोध हा सप्रमाण आणि तार्किक होता.देशातल्या अनेक वृत्तपत्रांनी तो केलाच.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिल्या जाणऱ्या महाराष्ट्रभुषणवर जेव्हा वाद चालू होता तेव्हा त्यावर आग्रही प्रतिपादन घेऊन बाबासाहेबांची बाजू घेणारा अग्रलेख कुबेरांनी लिहिला होता(हे आपण सहज विसरतो) FTII च्या विद्यार्थ्यांच आंदोलन असो किंवा जेएनयुच्या..लोकसत्ताची संपादकीय भूमिका ही अनेकदा संयत आणि संयमी राहिली आहे.
       ‘असंताचे संतपण’ हा अग्रलेख (वाचताना तरी) सप्रमाण आणि ससंदर्भ वाटतो.मदर तेरेसांच्या कार्याला असेलेली धर्मप्रचाराची किनार त्यातून त्यांना मिळालेलं नोबेल आणि आता चालून आलेलं संतपद हा या लेखाचा मुख्य गाभा.मदर तेरेसांच्या ख्रिस्ती धर्मप्रसारक म्हणून केलेल्या कामाला हात घालताना राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या पारंपारिक द्वंद्वालादेखील त्यांनी चर्चेत आणले.हिंदुधर्मातील अपप्रवृत्तींवर टीका करणारे अशा वेळी शांत बसतात आणि केवळ हिंदूधर्मचिकित्सा करून आपण स्वत:ला निधर्मी म्हणवतात.या सुधारणावादी आणि पाखंडी निधर्मीवाद्यांचा समाचार त्यात घेतला गेला.
     या लेखाला संदर्भांची जोड होती,लोकसत्तासारख्या दैनिकातून तो प्रकाशित झाला होता. Journalism of courage’ सारखं ब्रीद मिरवणाऱ्या express ग्रुपचे हे दैनिक.आणीबाणीपासून आज पर्यंत म्हणजे देशातील तथाकथित असहिष्णुता वाढत असताना त्याला कधी आपले संपादकीय मागे घ्यावे लागलेले नाही..मग नेमकी हीच वेळ काल का आली?ख्रिस्ती धर्मप्रसाराबद्दल काही लिहिल्याने तर अशी वेळ आली नाही ना?(तसही पेपर केरळात नाही महाराष्ट्रात चालतो)एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झाला म्हणून गळा काढणारे आता सोईस्कररित्या मीठाची गुळणी धरून बसतात.त्यामुळे लोकसत्ताची माफी जितकी धक्कादायक आहे तितकीच ती अनपेक्षितही.यानंतर कुणाच्याही भावना दुखावल्याचं कारण देत संपादकीय मागे घ्यायचा अनर्थकारी पायंडा पडेल ही जितकी भीती आहे तितकीच गोष्टी समजावून न घेता टीका करण्याचा आमच्या वृत्तीचा देखील.
       संपादकीय मागे घेऊन जिथे लोकसत्ताने अनेक प्रश्न आणि वादांना बगल दिली असे म्हणणे म्हणूनच गैर ठरते.प्रत्यक्ष अग्रलेखाने जितके प्रश्न उपस्थित केले नव्हते तितके प्रश्न या एका माफीने उपस्थित केले.कारण शेवटी पत्रकारिता ही नवीन प्रश्न निर्माण करण्यासाठी असते आणि लोकशाही ही उत्तरे शोधण्याकरीता....!

Wednesday, 16 March 2016

ओवेसीसाहेब हमारा चुक्याच.....!


     असदुद्दिन ओवेसी यांनी परवा ‘मी भारत माता कि जय’ म्हणणार नाही अशी ‘जाहीर’ वक्तव्य केलं,काल त्यांचीच री ओढत वारीस पठाण यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशी घोषणा द्यायला नकार दिला आणि त्यांच्यावर सर्वपक्षीय टीका झाली,त्यातून त्यांच निलंबनही झाल.ओवेसींच्या विधानाचा अर्थ थोडं मागे जाऊन लावायला हवा.फेब्रुवारीत जेएनयु मध्ये जे काही घडले,ज्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या त्या अयोग्यच होत्या यात शंका नाही.पण देशातील बऱ्याच विचारवंतांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत ‘त्या’ तरुणांवर कारवाई नको असा सूर लावला.मग भारताच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेची व्यापक चर्चासत्र घडू लागली.त्यातून निर्माण होणारी मते साहजिकच 'उजव्या' राष्ट्रवादाच्या विरोधात होती.देशविरोधी घोषणा दिल्या तरी आपल्या राष्ट्रभक्तीला(?) बाधा येत नसल्याने ओवेसींनादेखील आपल्या एका विधानावर इतकी टीका होईल याची अपेक्षा नसावी.
     युरोपीयन राष्ट्रवादाची संकल्पना आणि भारताची संकल्पना यात मुलभूत फरक आहे,त्यांचा राष्ट्रवाद हा exclusion-centric आहे तर आपला ‘वसुधैव:कुटुंबकम’ मानणारा.अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी आपण सरळ ‘पाश्चिमात्यांकडे ते किती लिबरल आहेत’ म्हणून बोट दाखवतो परंतु त्याचवेळेला त्यांच्या देशभक्तीचा आदर्श आम्ही सोयीस्करपणे विसरतो.महायुद्धात प्रत्येक घरातील एक जण गेल्याने हे राष्ट्रप्रेम आतून येणारं आहे,त्याचवेळी आपण महासत्ता असल्याचा अभिमान अमेरिकेला राष्ट्रवादी बनवतो.सततची युद्धे,असुरक्षितता यामुळे इस्त्रायल पराकोटीचा राष्ट्रवादी.भारतात असं काहीच नाही.पारतंत्र्याच्या झळा सोसलेली पिढी आता उरली नाही.आमच्या देशातील युद्धे फक्त सीमांपुरती राहतात,त्याच्याही झळा आमचे पराक्रमी सैनिक आम्हाला लागू देत नाहीत.(अशा वेळी आपल्या एसी-ऑफिस मध्ये बसून एखाद्या गुलाबी पेपरची पान चाळताना १५ ऑगस्टला आमच्या राष्ट्रवादाला जाग येते आणि त्याच दिवशी उतरते)हा त्रास आम्हांला पूर्वजांच्या पुण्याईने सहन करावा लागत नाही हि खर तर त्यांची गंभीर चुक आणि जेएनयुच्या घोषणाबाजी नंतर देशापेक्षासुद्धा आम्हाला पोलिटिकल स्कोर सेटल करणे जास्त महत्वाच वाटत हि आमची चुक.
      इथे ओवेसी भारताच्याघटनेचा संदर्भ देतात,म्हणजे बायकोला पोटगी देताना धर्मग्रंथाचा आधार घ्यायचा,आणि अडचण येईल तेव्हा राज्यघटना आठवायची(क्या बात हैं..!)घटना तर ३७० कलम हि तात्पुरती तरतूद होती,समान नागरी कायदा आणा असंही सांगते....!
      म्हणूनच असदुद्दिन ओवेसी यांच विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे,ते जीनांच्या पाऊलावर पाऊल ठेवणारं नाही ना हे देखील बारकाईने अभ्यासायला हवं आहे,राजकारणाच्या गर्तेत ते अभ्यासण्याचा वेळ आणि विवेक कुणाला नाही.सत्ता.सरकार,राजकीय पक्ष येतील-जातील पण देश या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे,हे तुम्ही-आम्ही शिकलोच नाही...म्हणून ओवेसीसाहेब खरतर हमारा चुक्याच.
(छायाचित्र:इंरनेटवरून साभार)

Saturday, 5 March 2016

Submission

माझ्या लहानपणापासून 'गृहपाठ' या शब्दाची मी जितकी धास्ती घेतलीय तितकी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची घेतल्याचं आठवत नाही.साधारणतः मार्च महिन्यात "गठ्ठा बांधा रे"  म्हणून मास्तरांनी मार्शल लॉ पुकारला कि मला गृहपाठ करायची लहर यायची आणि मग दिवसाला एक या प्रमाणात वही पुर्ण करून मी ती शिक्षकां पुढ्यात देत असतं. "अक्षर चांगलं आहे"  या सबबीवर तेही जरा हात ढिला सोडून मार्क देत असतं. पुढे कॉलेजात गेलो आणि journal नावाचा वेगळा राक्षस (कि राक्षसीण?) आमच्या मानगुटीवर बसली.मग ते chemistry चे reading, physics चे tables,Botany-Zoology च्या आकृत्या,geography चे relief features जीव घ्यायला लागले.एव्हाना गठ्ठे बांधा रे चा हुकूम 'उद्या submission ची last date' असा येऊ लागला होता.Journal तपासताना मिळणारे मार्क्स हे शिक्षक-मुलगा-केलेले लेक्चर्स अशा त्रैराशिकाचं उत्तर असत.(काही जण फक्त खुशामती करणाऱ्यांनाच मार्क्स देत हा भाग निराळा) हे करताना होणारा अपमान आणि अवहेलना जो शांतपणे सहन करू शकतो तो स्थितप्रज्ञ(गीतेत तरी दुसरं काय सांगितलंय म्हणा)
          Journalism ला असल्याने नुकतंच यावर्षी एक प्रायोगिक वृत्तपत्र,internship report,assignment यांच submission केलं. यानंतर शैक्षणिक आयुष्यात काही submit करावं लागेल असं वाटत नाही.पण काही शब्दांचे वळ शिक्षकांच्या छड्यांइतकेच आपल्या आयुष्यावर खोलवर जातात,याचही तसंच आहे.
खरंतर 'शरणागतीला' submission म्हणणाऱ्या माणसाला साहित्यातील नोबेल द्यायला हवं,पण त्यासाठीचा अर्ज कुठे submit करावा हि सध्या आमच्या समोरची चिंता आहे.

Friday, 4 March 2016

हॅम्लेटचा बाप


किल्ल्याच्या तटबंदीवर गस्त घालताना
पहारेकऱ्यांनी ऐकली एक
कारस्थानी कुजबुज,
एका अदृश्य आकृती,
म्हणत होती राजपुत्राला,
"पोरा, हॅम्लेट
असा माझ्या मागे ये,
मी आलोय परत नरकांच्या यातनातून,
हजारो इंगळ्यांच्या दंश
उठवतो अंगार देहात,
माझ्या पापाचे विखार
देतात डागण्या माझ्या
जीवशून्य आत्म्याला.
या यातनेच्या डोहातून
मिळते थोडी सवलत,
रात्री मर्त्यलोकावर फिरण्याची.
तरीही छळते एक वेदना
सतत उरात.
माझ्या अनैसर्गिक मृत्यूची.
घे सुड त्याचा,
आणि कर मोकळं मला
प्राक्तनाच्या या यातनामय द्वंदातून."
कुणाचा सुड?
प्रश्नर्थक रोखाने बोलला हॅम्लेट,
"तुझ्या काकाचा"
संशयाची सुरुंग पेरत अंतर्धान पावली आकृती.
"सुड घे,
सुड घे,
सुड घे"
म्हणत वाढत गेला
पिशाच्चांच्या घोषणा.
गोंधळलेला हॅम्लेट तटबंदीवर तसाच उभा होता
भ्रमिष्टासारखा,
घोषणा तशाच वाढत होत्या.