Tuesday, 17 October 2023


मीरा बोरवणकर २०१७ साली निवृत्त झाल्या त्यावेळी त्यांनी Leave of Life नावाचं आत्मचरित्र लिहिलं आणि विश्वकर्मा प्रकाशनानं ते प्रकाशितही केलं. आता त्यांनी 'मॅडम कमिशनर' नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे, ते PAN नावाच्या उच्छभ्रू प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. दोन्ही पुस्तकात फारसा फरक नाही पण महाराष्ट्रातील बदललेली राजकीय समीकरणं आणि बोरवणकरांच्या नव्या आत्मचरित्राची वाढलेली पानं याचा काही संबंध आहे का ? केवळ १७० पानं जास्त लिहिण्यासाठी बोरवणकर ६ वर्ष वाट बघत होत्या ? त्या शासकीय अधिकारी असताना ज्या गोष्टींची वाच्यता करू शकत नव्हत्या त्याची वाच्यता निवृत्तीनंतर नेमकी आत्ताच का केली ?भूखंड-बिल्डर-डेव्हलपर-राजकारणी-नोकरशहा हा नेक्सस बोरवणकर यांना आत्ताच स्पष्टपणे का जाणवला ? स्वतः CBI च्या आर्थिक गुन्हे शाखेच्या उच्चाधिकारी असलेल्या बोरवणकर यांनी साधलेलं टायमिंग मजेशीर आहे...

विशेषतः सुप्रिया सुळे लोकसभेत आमच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करा म्हणणं आणि बोरवणकर यांनी  पुण्याच्या तत्कालीन पालकमंत्र्यांबाबत संशय निर्माण करणं यातला अदृश्य संबंध तपासायला हवा. 

नैतिकता ही कालातीत संकल्पना असली तरीही तुम्ही कधी ती प्रकट करता त्याला फार महत्व आहे.... 

Thursday, 27 July 2023

अग्निपंख

रामेश्वरम जवळच्च्या त्या समुद्रात 
आपली छोटी नाव वल्हवताना तो लडका बघत होता एक ख्वाब.....
आसमान कवेत घेण्याचं
पंछीसारखं उंच उडायचं…
हाताचे पंख करून किनाऱ्यावरून सैरावैरा धावताना,
तेच ख्वाब तरळायचं हमेशा त्याच्या नजरेत....
एक दिवस बघता बघता घेतली त्याने उडान,
क्या स्वतःचे दानापाणी यही है आसमान...?
एक वकत आकाशाकडे बघून स्वतःलाच बजावलं त्याने
“नही नही अभी बहोत उंचा उडना है”
पंख फडफडत,जी-जान लावून पुन्हा एक कोशिश,
थोड्या वेगळ्या उंचीवरून,त्याने पाहिली दुनिया..
चार-दोन पुरस्कार,पाच-सहा मानसन्मान 
यही तो है ना आसमान...?
“नाही,अजून थोडसं वर गेलो कि आलंच”
समजावलं त्याने स्वत;ला
पुन्हा एक जोरदार प्रयत्न...अन् तो पोहोचला,
त्याच्या अग्निपंखाच्या जोरावर
त्या उंचीवर,
जिथे पोहोचतात फारच कमी लोकं....!
खाली असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आता तो विणत होता,
त्याच स्वप्नाचं जाळं,
जे कधी पाहिलं होत त्याने...आसमान कवेत घेण्याचं
हे करता करता जेव्हा त्याने अखेरचे डोळे मिटले ,
तेव्हा त्याच्या नजरेतल्या स्वप्नांनी हा जहाँ रोशन झाला होता...
कधी काळी आकाशाला कवटाळू बघणारा माणूस,
आज स्वत:च एक नया आसमान झाला होता..!

Thursday, 30 March 2023

राम आणि तुलसी

"ए पळ पुढे....अपशकुनी कार्ट कुठलं...!"

दारात भिक्षा मागायला आलेल्या त्या सात वर्षांच्या घराविना पोराला सगळेच असं हटकायचे.जन्मतःच मातृप्रेमाला पारख्या झालेल्या त्याला अपशकुनी म्हणून बापानेही त्यागलं अन् बापही परलोकी गेला.वयाच्या अवघ्या दहाव्या दिवशी अनाथ झालेल्या या पोराला त्याच्या दाईने सांभाळलं.चुनिया तिचं नाव.गरिबी असली तरी पोटातली माया तिला स्वस्थ बसू देईना.शकुन-अपशकुनाच्या गोष्टी मनाला स्पर्श करेनात.तिनं त्या बाळाला घरी आणलं आणि त्याचा सांभाळ करू लागली.
बाळ दिसा-मासाने वाढत होता पण आजुबाजुची लोकं त्याला जवळ करत नव्हती.चुनियाचा नवरा तिला ओरडायचा, "कशाला आणलंस त्याला इथे..." 
सासू बोट मोडत,"आईबापाला गिळलं तसं आम्हांला गिळेल हो हे पोर...." म्हणायची. 

अन एके दिवशी घात झाला.... 
नदीवर पाणी आणायला गेलेल्या चुनियाला साप चावला आणि ती गेली.तिच्या नवऱ्याने त्या पोराला घराबाहेर काढलं. 
तेव्हा पासून दोन वेळच्या जेवणासाठीही तो कोवळा जीव पराधीन झाला.भिक्षांदेही करावी म्हटलं तर कुणी भिक्षाही देईना. 
भुकेने कासावीस झालेल्या घरादाराविना-अन नावविना त्या पोराला एक मंदिर दिसलं.रामाचं मंदिर.
देवळाच्या पडवीत बसून आसवं ढाळत तो भुक मारू लागला. 
देवळाच्या महंताला त्याची दया आली,नरहरीदास नाव त्यांचं. त्यांनी त्याला दुध दिलं-फळ दिली.नाव गाव पुसलं....
नावच नव्हतं तर सांगणार काय...!
लोकांच्या बोलांनी दुखवलेला ते पोर नरहरीदासांना म्हटलं, "माझ्या जवळ नका येऊ बाबा,माझी काळजी घेणारी लोकं जगत नाहीत जास्त.... मी अपशकुनी आहे ना म्हणून"
नरहरीदास हसले आणि म्हणाले "सगळ्या जगाचा पालनकर्ता तो रामचंद्र.त्याला ना जन्म न मृत्यू....तो सर्वव्यापी आहे.त्याला शरण जा बाळा,तो घेईल तुझी काळजी..."

"अन तो मला कसा भेटेल...?" त्या उपेक्षित जीवाने नरहरीदासांना विचारले. 

ये सांगतो म्हणून नरहरीदासांनी मुलाला त्रयोदशाक्षरी कानमंत्र दिला...श्रीराम जयराम जयजयराम.

मुलगा आनंदला..

नरहरीदास म्हणाले,"तुला नाव नाही ना रे...आजपासून तुझं नाव रामबोला.."

देवळातल्या रामाच्या चरणाला मिठी मारून मुलगा रडू लागला. 
अनाथ असण्याचे शल्य संपले,
आजपासून तात-माता-बंधू-सखा सगळं सगळं श्रीराम....
त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. 

रामबोलाला राम मिळाला,आता फक्त स्वतःसाठी नाही जगाला रामकथा सांगायला,विकल मनांना धीर द्यायला.तुम्ही एकटे नाही तर शर-चाप धरलेला राम पाठीशी उभा आहे हे सांगायला.

'दीन दयालु विरद संभारी ।
हरहु नाथ मम संकट भारी ।। म्हणायला. 

रामचरितमानस रचायला....
त्यासाठी रामबोलाचा तुलसीदास होणं अजून बाकी होतं.....

Thursday, 16 March 2023

सडक

हि तशी फार पुर्वीची गोष्ट नाही.अगदी आत्ताआत्ताची आहे.... 
ग्रामीण भागात 'टार-रोड' झालेले नव्हते,पायवाटा-कच्च्या सडका आपला आबा राखून होत्या.बैलाच्या गळ्यातील घुंगरमाळांच्या तालावर बैलगाडी धुळमाती उडवत चालायची.चकाऱ्यांशी सलगी करत छकडा धावायचा कधी खकाना उडवीत एखादा उमदा घोडा चौखूर उधळीत जायचा.चरायला गेलेली गुरं-वासरं मावळतीला धुळमाती अंगाला लेवूनच येत असत.पुढे काळ बदलला,भावक्या कज्जे लढायला 'राजदूत' वरुन जाऊ लागल्या,तालेवार ताडपत्री लावलेल्या 'जीप' मधून रुबाब मारायला लागले गावातली कच्च्या सडका मायबाप सरकारच्या कृपेने पक्क्या व्हायला लागल्या.ट्रॉलीभर ऊस फॅक्टरीला जाऊ लागले गावात मायंदळ पैसा येऊ लागला,शेती सुधारायला लागली,नवे नवे प्रयोग व्हायला लागले. 

        शहरातल्या माणसांना यातलं काही माहिती नव्हतं,पण त्यांना खेड्यातल्या आयुष्याचं मोप कौतुक.सिनेमा-कादंबऱ्यांनी ते वाढवलेलं.मग ऍग्रो-टुरिजम' सुरू झालं.चुलीवरच्या भाकऱ्या,झुणका,पेरू-चिंचा जोडीला रानातली गार सावली अन अंगावर धूळ उडवीत बैलगाडीतुन चक्कर......!
        पण खर्चाची गणितं सगळ्यांनाच जमतात असे नाही,इथं पुणे महानगरपालिका नागरिकांच्या मदतीला येते,म्हणजे कर्ज वैगेरे देऊन नाही बरं,गावभरचा रस्ता खणायचा म्हणजे उडणारी धुळ लोकांना agro tourism ची आठवण करून देईल.उडणारा फुफाटा लोकांना गावात गेल्याचा आनंद मिळतोच शिवाय चौकात चौकात खोदलेला रस्ता सारी खुदाई एक तरफ या पारंपरिकतेलाही छेद देणारा आहे.एकूणच काय तर एका थोर कवीने किती यथार्थ वर्णन केलंय,
        "क्यूँ जाए एग्रो-टूरिजम के लिए गांव में,
        कुछ दिन तो गुजारिए पुणे मनपा की छाँव में ।"
      
        

Wednesday, 1 March 2023

कसबे में कौन बा ?

खरं तर शहरातील मतदारसंघात कामं आपोआप होतात.आरमोरी-जत सारख्या मतदारसंघातील लोकांना शिक्षण-रस्ते-वीज-आरोग्य-पाणी यांसारख्या मुलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो तो शहरातल्या मतदारसंघाच्या नशिबी नसतो.कसब्याबाबतही हेच आहे.शहरातील दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टींकडे महापालिका लक्ष पुरवते,स्मार्ट-सिटी असल्याने पुण्यात एकच रस्ता अनेक वेळा खणायला आणि परत त्याचे डांबरीकरण करायलादेखील पैसा आहे.मेट्रोचे काम ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाडीच्या गतीने का होईना पण पुढे चाललेले आहे.रस्ते झाडले जातात,कचऱ्याचे ढिग साचत नाहीत.एकुणच काय तर पंचेंद्रियांना इथल्या विकासाचा अनुभव येतो.खासदारकी, आमदारकी, महापालिका एवढ्या सगळ्या सत्ता केंद्रावर भाजपाची मजबूत पकड आहे.तरीही एका लहान पोटनिवडणुकीसाठी दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोनदा पुण्यात येऊन गेले.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तळ ठोकून बसले.स्वतःचा मतदारसंघ नसलेले चंद्रकांत पाटील रासनेंना निवडून द्या म्हणून पायपीट करत होते.१९९५ पासून भाजपचा निर्विवाद गड असलेल्या कसब्यात भाजपाला एवढे परिश्रम घ्यायला लागणं खरं तर भाजपा बॅकफुटवर गेल्याचं लक्षण होतं.


फडणवीसांच्या रोड-शो मध्ये 'अयोध्या तो झांकी हैं,पुण्येश्वर अभी बाकी हैं..'च्या घोषणा दिल्या गेल्या.शेवटी नाही म्हटलं तर शेवटचा प्रयत्न म्हणून हिंदु-मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयोग (आणि त्याला पवारांनी दिलेली साथ ) भाजपाची अस्वस्थता दाखवतंय.२००९ ला बापट आणि मनसेच्या धंगेकर यांच्यात केवळ  ८१६४ मतांचं अंतर होतं.काँग्रेसकडून रोहित टिळकांनी ४६००० मतं मिळवली होती,मतविभाजन झालं म्हणून बापट निवडून आले.त्यानंतर दोन्ही निवडणुका भाजपने २५००० च्या फरकाने जिंकल्या आहेत.२०१४ ला मनसेकडून लढताना धंगेकरांना २५९९८ मतं मिळाली होती, काँग्रेसला ३१३२२,राष्ट्रवादीला १५८६५.यावेळी मतविभाजनाची संधी नाही, काँग्रेस-राष्ट्रवादी-उबाठा गट एकत्र आहेत.अशावेळी धंगेकर रासनेंना धुळ चारणार की कसब्यातील भाजपचे 'सुवर्णयुग' रासने कायम ठेवणार हे उद्या स्पष्ट होईलच.
एक नक्की २+२ ची बेरीज करण्यासाठी कॅल्क्युलेटर वापरणाऱ्याला हुशार नक्कीच म्हटलं जात नाही.भाजपची अवस्था काहीशी अशीच आहे.