Saturday, 5 November 2016

रम्याची गोष्ट

   आमचं रम्या,येगळंच माणूस बघा.म्हंजी इपितरपणा किती असावा एखाद्यामध्ये काय लिमिट नाही त्याला.तसं त्याच नावच रमेशकुमार...पण सगळे त्याला रम्या म्हणत.निस्त्या खोड्या काढ नी दंगा कर.
       एकदा काय झालं,शाळेत हुतो आमी सारे.तर याने तिथं गप बसावं कि नाई?
नाईच ओ,तिथंपण दंगा सुरु...
मास्तर आम्हांला सांगायचं प्रश्न विचारणं चांगलं असतंय,माणूस हुशार हुतोय म्हणून.आमी कधी इचारले नाय बा.पण ही रम्या काहीबी इचारायचं.
मास्तरला विचारतंय,
"सिनेमा कधी येणार म्हणून?
गावात कुस्ती कोण जिंकणार?
औंदा सरपंच कोण होणार?
खिचडी कधी मिळणार खायला?"
      मग गणिताच्या तासाला असले प्रश्न विचारले की काय होणार....मार खायचं ते नुसतं.
       एकदा यान काय केलं माहितीय का?
मास्तर गेलं हुतं बाहेर...
हे रम्या, चावट घुसलं कि त्याच्या खोलीत..
आणि त्याची पुस्तकं, रंगीत खडू,खेळाचं सामान सगळं उचकलं....पोरांनी रंगीत खडू खेळायला घेतले पण.

मास्तर बाहेरून आलं तेव्हा त्याला कळलं हे सगळं.
मास्तर म्हणाले "रमेश कुमार,तु असं का वागलास?
शिक्षकांच्या खोलीत का शिरलास?"
रम्या गार....बोलणार काय,चुकलंच हुतं.
मास्तर म्हणाले आता थांब,कारवाईच करतु,
आणि त्यांनी एक दिवसासाठी रम्याला शाळेतून suspend केलं...हाकलून दिलं ओ डायरेक एक दिवसासाठी.

जवा हे घरी कळलं तवा रम्याच्या पैलवान बापानं खेटराने पुजा बांधली होती त्याची....

त्यानंतर कधी असला आगाऊपणा केला नाई रम्याने,आपली चूक असताना बी शायनिंग मारायचा प्रकार कि नाई नव्हता त्या टायमाला.

आज हे सगळं अचानक आठवलं...
का विचारा कि राव.....प्रश्न पडले पाहिजेत,
  'पण प्रत्येक प्रश्न आत्ताच पडायला सुरुवात का झाली?' असा प्रश्न नको पडायला.
काय म्हणता?

Monday, 31 October 2016

आमचे पत्र

प्रिय तात्या
        इकडून पाठवलेला फराळ मिळाला असेलच.
हल्ली सगळे शुभेच्छाच पाठवतात फराळ कुणीच पाठवत नाही.उठसुठ फटाके वाजवूं नका सारखे मेसेज पाठवत बसतात.तिकडे न्युयॉर्कला वाजतात का फटाके?आता ३१ डिसेंबरला फटाके उडतात म्हणे तिकडे.किती भारी दिसत असतील ना ते?
आकाशात उंच जात,मग त्यांची रोषणाई डोळ्यांचं अक्षरश: पारणं फेडत असेल.गगनचुंबी इमारती असल्या कि असले फुकटचे सल्ले कुणी देत नसेल बहुतेक.
नाईकांच्या राजाने सिडनीचे फोटो टाकले होते म्हणे फेसबुकला,पाहिलेस का?
       ऑलिंपिकमध्ये सुद्धा वाजतातच कि फटाके,ते सुद्धा आनंददायी.मनमोहक वैगेरे असतात.
डिस्ने लॅन्डमध्ये स्पेशल लाईट शो असतो म्हणे?मी पण म्हणतोय यंदा जाऊन यावं हॉंगकाँगला.पण मला रजा मिळत नाहीये.
               आणि मजा माहितीय का तुला?
या विलायती फटक्यांनी आजिबात प्रदुषण होत नाही म्हणे.म्हणून पुढच्यावेळी इकडून फराळ पाठवला कि तिकडून फटाके पाठव.
कसे?
      
ता.क.
     तिकडे ट्रम्प येईल की हिलरी? कुणीही येवो निवडणुका जिंकल्यावर ते फटाके फोडतात का कळव.
                                                 तुझाच
                                               स.दा.भोळे
                                         
     

Friday, 21 October 2016

संग्राम


“काय मग घरी कधी जाणारेस रे?”
stall वरचा ‘हिंदू’ उचलता उचलता मी संग्रामला विचारलं.
खरंतर ‘घरी कधी जाणार?’ किंवा ‘झालं का रिझर्वेशन?’ असे प्रश्न विचारण्यात हाशील काहीच नसते,त्याची जाण्याची तारीख मला लक्षात राहणार देखील नाही.
पण समोरच्याला तेवढच बरं वाटत(आणि आपण त्यामानाने लवकर जाणार याचा आनंदही होतो.)
“घरी होय?आता कशाला घरी जायला पाहिजे आणि?” आपल्या कोल्हापुरी लहेज्यात तो उत्तरला.
“दिवाळी आलीय ना,घरी नको जायला?”,मी
 “नाही ओ,आता हेच आपलं घर.
इथचं आम्ही लाडू करंज्या बनवणार,
इथचं फटकेपण वाजवणार....अभ्यंगस्नान काय रोजच असतय कि आपलं...!”
स्वत:च्या विनोदावर त्याने एकट्यानेच हसून दाद दिली.
“घरी काही नाही ओ,तिथं गेल्यावर करायचं काय?
अजून किती दिवस? असे टोमणे ऐकणार
कि घरच्यांच्या प्रश्नार्थक नजरांना उत्तर देणारं...त्यापेक्षा इथचं बर कि..काय?
ते तुमचं आयोग जागा काढणा आणि आम्ही पास होईना. ते होईपर्यंत घर नाही बघा आता.",संग्राम
त्याच्या Sarcastic  स्वभावाबरोबर त्याच्या आत काहीतरी जळत असल्यासारखं मला वाटलं.
“चला मग येतो..बसतोय रीडिंगला”
  माझा उजवा हात कडकडून दाबत त्याने माझा निरोप घेतला.सकाळी सकाळी सदाशिवात स्पर्धा-परीक्षा करणाऱ्यांच्या फौजा अभ्यासिकेत जायला निघालेल्या असतात.त्यात तो ही हरवला..
एव्हाना आमच्या चहाची वेळ झाली होती...चहाला गप्पांची उकळी आणावी मी शेजारच्याला विचारलं...
“काय मग झाल का रेल्वेचं रिझर्वेशन?”

     त्याला एकेरी हाक मारावी असं खरं तर त्याच वय नाही,सत्ताविशी-अठ्ठाविशीतलं वय,अंगमेहनत करून कमावलेलं शरीर,उंचीही चांगली सहा फुटाच्या आसपास,चेहऱ्यावर काळजीपूर्वक संगोपन केलेल्या फक्कड मिशा.कोल्हापूरजवळ त्याचं कुठंतरी गाव आहे,घरी उत्तम जमीन आहे,उसाच्या कारखान्यात शेअर्स आहेत...तसं पाहिलं तर नोकरीच काय पण शिक्षणाचीही गरज नाही.
(तसंही आपल्याकडे शिक्षण हे फक्त नोकरी डोळ्यांसमोर ठेऊन घेतात हा भाग अलाहिदा)
       त्याची आणि माझी पहिली भेट जराशी चमत्कारिकच झाली.झालं असं मी पुस्तकाच्या दुकानात गेलो होतो..आणि मला हवी असलेली पुस्तकं काही केल्या उपलब्ध होत नव्हती.
"तो पाटलाचा ठोकळा घ्या की यापेक्षा ?"
  आगंतुकपणे आपल्याला सल्ला देणारा हा कोण म्हणून मी काहीसं त्रासिकपणे त्याच्याकडे पाहिलं,आणि काहीसा हसलो.
"वाचून घ्या हो तो,फायद्याचा आहे.,
आयोग क नाई त्याला लक्षात घेऊनच प्रश्न काढतंय,कळलं काय?"
वास्तविक तो ज्या पुस्तकाची महती गात होता ते मी काळ कि गोर हे पाहिलं नव्हतं.
मग त्या पुस्तकाची रचना,त्यावरून आलेले प्रश्न ,काठिण्य पातळीला (म्हणजे नक्की काय देव जाणे?)अनुसरून असणारा त्याचा कल आणि बदलत्या परीक्षा पद्धतीला अनुसरून त्याची केलेली मांडणी अशी यावर पुढचा अर्धा तास त्याने माझं बौद्धिक (कि शाळा?) घेतली.
"नक्की नक्की,आता लगेच घेतो वाचायला."मी
अत्यंत तीव्रतेने दिलेला होकार हा शहाणी माणसं नकारासारखा समजतात हे गमक बहुदा त्याला ठाऊक नसावं.
    मुक्त विद्यापिठातुन पदवी घेत D.Ed करत स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांची एक पिढी महाराष्ट्रात उदयाला आली.हाही त्यातलाच एक....

        स्पर्धा परीक्षा करणारे हाच काय सगळेच नमुने कमी आधिक फरकाने असेच.सकाळी उगवतीच्या आधी यांचा दिवस सुरु होतो.उजव्या हातात लोकसत्ता किंवा मटा (केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत असेल तर हिंदू आणि एक्स्प्रेस),जोडीला स्पायरल बाइंडिंग केलेल्या नोट्स,एखादं राज्यशास्त्राच पुस्तक,फॉर्मल शर्ट आणि पँट घातलेले,इनशर्ट केलेले अनेक जण तुम्हांला दिसतील.वाचुन वाचून डोळ्यांचा नंबर वाढलेला. मानेवर खडा ठेऊन दिवसभर अभ्यास करायचा आणि पोटापाण्यासाठी रात्री एखाद्या एटीएम मध्ये नोकरी करायची.
         अशावेळी नाश्ता जेवण याबाबी केवळ पोट भरण्यापुरत्या उरतात.Entertainment एखाद्या स्वस्तातल्या थेटरात सिनेमा बघण्यापुरती.

      खरंतर हा एका अशाश्वताकडून दुसऱ्या अशाश्वताकडे जाणारा प्रवास आहे.'डोंगराच्या पलीकडे सुंदर गाव आहे.' या आशेवर माणूस पुढे जात बसतो. रस्त्यातल्या बोचलेल्या काट्याच्या जखमा अनेकांना
दिसत नाहीत.लालदिवा,स्टारडम आदी बाबींकडे मात्र लोकांचे लक्ष सहज जाते.या 'स्टारडम' भुलून चित्रपटाकडे जाणारे होतकरू नट आणि सरकारी मानमरातबाच्या पोटी घरदार सोडून अहर्निश कष्ट करणारे हे विद्यार्थी सारखेच समजावेत का?
      दिवाळी नंतर पुन्हा पुण्यात गेलो कि पुन्हा संग्राम भेटेल,त्याच तडफेने घरदार विसरून अभ्यास करताना.कदाचित काही नवशिक्यांना फुकाचे ब्रम्हज्ञान देतानाही सापडेल एखाद्या चहाच्या टपरीवर.
         आता भेटल्यावर मात्र मी त्याला वेगळा प्रश्न विचारेल(कदाचित तितकाच निरर्थक असलेला)
"काय मग,सुटल्या का जागा?"
आणि पुन्हा एकदा आमच्या बेचव नाश्त्याला गप्पांची फोडणी देता देता तो काहीसा सुसह्य करता येईल.

समाप्त
निखील कुलकर्णी©
सर्व हक्क लेखकाधीन


                                                          

Tuesday, 18 October 2016

विचार न करितां कारण....


         भारताची सर्जिकल स्ट्राईक जितक्या बेमालूमपणे झाली तितक्याच किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेने त्यावर देशात टिप्पणी केली गेली.मग आत्यंतिक राष्ट्रवादाने पेटून पाकिस्तानला संपवण्याची केलेली भाषा असो किंवा मोदीद्वेष्ट्यांनी या स्ट्राईकचे पुरावे मागण्याइतपत केलेला शहाणपणा(?) असो.दोन्हीही अतिरेकी आणि तितकेच विचारहीन.परवा या वादात अजून एक भर पडली.देशाचे रक्षामंत्री मनोहर पर्रीकर यांनी "....कदाचित संघाची शिकवण कामी आली असेल." अशा अर्थाचं एक विधान केलं.(मूळ विधान खाली बघा) आणि सगळीकडे हलकल्लोळ उठला.तो उठणही स्वाभाविकच होतं म्हणा.
       या विधानावरून कुठूनही या हल्ल्याची प्रेरणा संघ,तिथले बौद्धिके,पद्य  यात दडली आहे असं म्हटलं नाही.भाषेचा अर्थ उत्तम लावणारा कुणीही 'कदाचित(maybe)' चा सुयोग्य अर्थ लावतो.(मुद्दलात तो काढायला वेळ कुणाला आहे?असो)
त्यांच्या सांगण्याचं तात्पर्य हे आमची निर्णयकौशल्यता,अचूकता,आक्रमकता हे सारं संघशिक्षेतुन आलं असा होता.वास्तविक इथे पर्रीकर आणि संघाला घेरणे सोपे होते."एक 'सांस्कृतिक संघटना' तुम्हांला surgical strike ची प्रेरणा देते म्हणजे तुम्ही युद्धखोर आहात,फॅसिस्ट आहात"वैगेरे सरावाचे आरोप संघावर करता येणं शक्य होतं.खरंतर यावर त्यांची उत्तम कोंडी झाली असती.राहुल गांधी यांना देखील बोलायला अजून एक मुद्दा मिळाला असता,चॅनेल्सला टीआरपी मिळाला असता,पेपरला रकानेच्या रकाने भरून लिहिता आलं असतं.पण हा सगळा फायदा या त्रयी गमावला तो चुकीचा अर्थ काढून.(त्यामुळे चुकीचा अर्थ काढताना तो निदान स्वतःसाठी तरी बरोबर असेल याची काळजी घ्यायला हवी.)
   आरोपांच्या बेछूट,तर्कहीन आणि अविचारी फैरी चालवायचा म्हटलं की विरोध 'कुठं' करायचा ते हि कळलं पाहिजे....!मोदींच्या आणि संघाच्या द्वेषापायी मोदीद्वेष्ट्यांचा हा विवेकच गहाळ झालाय का असा प्रश्न पडतो तो यामुळेच.©

टीप-
१)
" The Prime Minister hails from Mahatma Gandhi's home state and
defence minister comes from Goa which never had a 'martial race'.
And then take this surgical strike. This was a different kind of
combination. May be the RSS teaching was at the core," said
Parrikar at an event in Ahmedabad's Nirma University.
http://toi.in/B-G3Pb/a19li

Saturday, 10 September 2016

तो

"चांगुलपणा एवढं वाईट काही नाही जगात..."
         इतकं टोकाचं नकारात्मक कोण बोललं म्हणून मी मागे बघितलं,तो उभा होता.पन्नास-पंचावन्न वय असावं,उंची तशी बेताचीच,जाड काड्याचा भिंगाचा चष्मा,पायघोळ पायजमा, अंगात सैलसर पांढरा शर्ट,डाव्या हातात एक कापडी पिशवी,उजव्या हातात चहाचा ग्लास धरत आपल्या मित्राला तो हे सांगत होता.आजच्या युगात एवढा ८०च्या दशकातला पोशाख केलेला आणि इतका नकारात्मक बोलणाऱ्या गृहस्थाच मला पहिल्यांदा हसू आलं....चहा संपवून मी आणि माझे मित्र विनोदात बुडालो,'त्याच' तत्वज्ञान सुरूच होतं,
"म्हणून सांगतो तुला,इतके उपकार करू नयेत कुणावर रे..."
त्याने आपल्या अनुभवाची शिदोरी पुन्हा एकदा सार्वजनिकपणे खुली केली,हातातला चहाचा ग्लास टेबलवर आदळून सुट्टे दहा रुपये त्याने काऊंटवर दिले आणि पायातली करकरती पुणेरी वहाण वाजवत तो चालायला लागला.तो दृष्टीआड होईपर्यंत मी त्याची ठेंगणी मूर्ती बघत होतो.
    उन्हे कलायला लागली की ओंकारेश्वराच्या पुलावर आमचा मित्रमेळा जमत असे.(म्हणजे अजूनही जमतो)मग हास्यविनोदापासून राजकारणापर्यंत आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वापासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंत अनेक भौतिक-आधिभौतिक विषय चघळत बसायची आमची पुणेरी सवय.रोजच्या शेंगदाणेवाल्याकडून खाऱ्या दाण्याची पुरचुंडी घ्यायची आणि ती संपेपर्यंत गप्पा झोडत बसायच्या.
"तो पक्षी गरुड आहे की घार आहे?" एक पृच्छा.
"घार आहे रे ती,गरुड एवढा लहान नसतो.."निरसन
"अरे पण ती छोटी घार असू शकेल ना?" थोडीशी तिरकस शंका...
अशी काहीशी बोलणी चालू होती,हातातले शेंगदाण्याच्या पुडीशी चाळा करत मी शांतपणे ऐकत होतो.
तेवढ्यात 'सफर'चं 'जो तुम को हो पसंद वही बात करेंगे...' ऐकू आलं.
मी 'लाजवाब' म्हणून शेजारी बघितलं तर 'तो' फुटपाथवर बसलेला.
लेस लावलेला एक जुना मोबाईल खिशात ठेऊन तो गाणी ऐकत होता.
आजूबाजूच्या जगाचं त्याला फारसं देणं-घेणं नव्हतं...आपण ऐकत असलेल्या गाण्यामुळे कुणाला त्रास होतोय याची ना तमा होती ना कुणाला आनंद होतोय याची जाणीव.अजून चार-पाच गाणी ऐकून त्याने घड्याळाकडे बघितलं.आणि गाणी बंद करून आपली कापडी पिशवी उचलली.खिशातून विडी काढून ती पेटवली.ती ओढण्याची देखील त्याची एक लकब होती,तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्ये विडी धरून ती तो ओढत असे.त्याच्या चालण्याच्या त्या  कर्रssकर्र आवाजाबरोबर तो अदृश्यही झाला.
           त्यानंतर अनेकदा तो त्या पुलावर दिसायचा,त्याच वेळेला गाणी ऐकत.आठ वाजले की निघून जायचा.त्याचं गाण्यांचा संग्रह  मात्र सुंदर होतं.कुमारपासून किशोरपर्यंत अनेक गाणी तो ऐकत असे,ऐकवत असे.स्वरांच्या जलौघात न्हाऊनही  हा मनुष्य इतका कोरडा कसा शकतो याचं कोडं मला राहून राहून वाटे.

"तुमचं गाण्याचं collection छान असतं."
शिष्टाचाराची पारंपरिक पद्धत न पाळता मी त्याला compliment दिली.
आपली समाधी भंग करणारा हा कोण ? या प्रश्नार्थक भावाने त्याने माझ्याकडे त्रासिकपणे पाहिलं.
मला याची अपेक्षा होतीच म्हणून मी माझ्या ठेवणीतलं दुसरं हत्यार काढलं..
"कुठून जमवलीत एवढी गाणी?"
"हम्म्म..."
तो काहीसा गोंधळला,त्याच्या डोळ्यांची चमत्कारिक उघडझाप झाली.
"चहा घेणार?"
माझ्या या प्रश्नावर त्याने अनिच्छेने मंद स्मित केलं आणि नको म्हणाला.
घड्याळाकडे बोट दाखवत,
"आता जायची वेळ झाली.."
असं पुटपुटला आणि चालायला लागला.
   त्यानंतर तो अनेकदा दिसत असे,
कधी कधी नमस्कार-चमत्काराचे सोपस्कारही पार पडत.
पण शिष्टाचाराच्या परीटघडीला मोडून त्याने कधी आमच्याशी संवाद साधला नाही आणि त्याच्या जिवंत समाधीतून आम्ही त्याला कधी बाहेर काढलं नाही.
      नंतर बराच काळ परीक्षांमुळे मी त्या पुलावर गेलो नाही.
हल्ली त्याच्याबरोबर त्याच्या तो चहा पिणारा मित्र येत असे.
हा त्याच्यापेक्षा फारच वेगळा.साडेपाच फुटाच्या आत बाहेरची
उंची,पोट सुटलेलं,दाढीचे खुंट वाढलेले आणि आपल्या वयाला न शोभणारा
टीशर्ट घातलेला,हातात एक रंगीबेरंगी रुमाल.तो मात्र आमच्या बरोबर बोलायचा....
त्याचा मित्र अगदीच भिन्न प्रवृत्तीचा,त्याच्या आयुष्याला वळणं वैगेरे असं काही नव्हतचं.कायम टीशर्ट घालणाऱ्या माणसाच्या आयुष्याला परीटघडी कसली म्हणा?निर्मात्याने दोन वेगळ्या साच्यातून काढलेले हे दोघे एकत्र कसे राहतात याचं मला नवल वाटे.
काही काळाने त्याच्याशी ओळख वाढली,
एकदा सहज चहाच्या टपरीवर मी त्याला विचारलं
"का ओ? तुमचे ते मित्र असे तंद्रीत का असतात कायम?"
"कोण तो ना?" त्याने विचारलं
"हो?"
"तसा नव्हता तो पूर्वी,४० वर्ष ओळखतो मी त्याला.
पूर्वी तो हि नीट होता,लहानपणीच वडील गेले.गरीबीत वाढून मॅट्रिक झाला आणि नोकरी लागली.
लग्न झालं.सगळं सुखाने सुरु होतं.पण सुख 'खो' घालतं म्हणतात ना ते असं बघा.
"म्हणजे?"
"त्याचा मुलगा गेला,चार-पाच वर्षांचा असेल...
विषमज्वर झाला त्याला,नीट उपचार मिळाले नाहीत.त्यात तो गेला.  तो गेला आणि इकडे आमच्या वहिनींना वेड लागलं पुत्रशोकाने,त्या वेड्यांच्या इस्पितळात."
"अरेरे..." मला हळहळून आलं.
"आई आणि हा दोघेच,मग आई गेली काही वर्षांनी.थकलीच होती म्हातारी.
ती गेल्यावर याने असलेली नोकरी सोडली आणि सरावाच्या दारिद्र्याबरोबर पुन्हा संसार सुरु झाला."
डोळ्यात दाटलेलं पाणी नकळतपणे आपल्या रंगीबेरंगी रुमालाला पुसत त्याचा मित्र मला सांगत होता...
मी सुन्नपणे सगळं ऐकत होतो,
जराशा टोचणीने डोळ्यातून पाणी येणारे आम्ही खरे की आयुष्याने जीवनरस शोषून घेतल्यावर डोळ्यांतुन टिपूस न गाळणारा तो खरा?
भितींचे पोपडे उडाले म्हणून आकांत मांडणारे आम्ही अस्सल कि स्वप्नांचे इमले जमीनदोस्त झाल्यावरही त्याच्याकडे निरसपणे बघून बिडी शिलगावणारा हा?
हे मला अजूनही समजलेलं नाही.
आज रुक्ष आणि कोरडा वाटणारा प्रत्येक प्रवाह कधीकाळी तुडुंब भरलेला असतो...
त्यानंतर मला ते दोघे कधीच पुलावर भेटले नाहीत,पण अजूनही संध्याकाळी पुणेरी वहाणेचा कर्रssकर्रर्रर्र आवाज ऐकू आला की माझे कान टवकारले जातात.

समाप्त.
सर्व हक्क लेखकाधीन©

Thursday, 8 September 2016

पर्यावरणाशी मैत्री तर बाप्पाची भक्ती

थोडीशी पार्श्वभूमी:
थोडासा अभ्यास करता असे लक्षात आले की पूर्वी लोक शाडूची मूर्ती बसवूनच गणेशोत्सव साजरा करत असत. आणि शास्त्रात सुद्धा शाडू मातीच्याच(नदीजवळ मिळणाऱ्या मातीपासून) मूर्ती स्थापन कराव्यात अशी आज्ञा आहे.
कालांतराने  व लोकसंख्या वाढीमुळे मूर्त्यांची मागणी वाढली. साहजिकच शाडू च्या तुलनेने बनवण्या स सोप्या आणि जलद असल्यामुळे प्लास्टर ऑफ परिस चा वापर होऊ लागला. नैसर्गिक रंगांऐवजी सहज उपलब्ध रासायनिक रंगांचा वापर वाढला. साच्याचा वापर केल्याने मूर्ती अधिक रेखीव आणि सुंदर वाटू लागल्या. साहजिकच, लोकही त्यांचीच मागणी करू लागले. लवकरच, प्रदुषण वाढू लागले. आणि पर्यावरण मित्र प्रबोधनासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा प्रसार करु लागले.
माझा पर्यावरणपूरक गणेशोत्सव अनुभव:
यावर्षी प्रथमच शाडूची गणेश मूर्ती बसवली. शाडूच्या मूर्ती वर नीट रंग बसत नाहीत. PoP च्या मूर्ती अधिक देखण्या व रेखीव असतात. परंतु  जरा विचार केल्यावर या निकषावर आलो की जिथे भाव महत्त्वाचा तिथे या बाबी फिक्या पडतात. ठरवलं आणि एक छानशी मुर्ती निवडली. घरी आणली. प्राणप्रतिष्ठा करुन मनोभावे पूजा केली. नेहमीच्याच मोठ्या उत्साहात दिड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला. निरोप देतानाही प्रथमच घरीच बादलीत विसर्जन केला.  विसर्जनानंतर दोन तासांत शाडू ची मूर्ती पूर्णपणे विरघळते. राहते ती माती आणि पाणी. मग वर आलेलं पाणी झाडांना घातलं आणि तळाशी राहिलेली माती झाडांच्याच मातीत मिसळली.
आपण मूर्ती नदीमध्ये विसर्जन करतो. त्यानंतर त्याचे काय होते कळत नाही. आपला बाप्पा विसर्जन केल्यावर थोडासा वाहत पुढे पुढे जातो आणि थोड्या वेळाने बाजुला विसावतो. त्यानंतर आपण तर तिथून निघतो. परंतु त्या मूर्ती चे काय झाले असेल किंवा होईल अशी सुप्त रुखरुख मनाला कायम सतावते. किमान माझा अनुभव असाच आहे. घरी विसर्जन करताना या वर्षी या रुखरुखीचा प्रश्नच नव्हता. मूर्तीचे काय झाले हे समोर होते. वैज्ञानिक दृष्टया पाहिले तर असे दिसून येते की नदीत विसर्जन करता ती मूर्ती निसर्गालाच मिळते आणि घरी विसर्जन केल्यावर झाडाला घातल्यामुळेही निसर्गालाच मिळते. त्यामुळे त्यातही काही शंका राहिली नाही.
थोडसं वेगळं वाटलं परंतु पर्यावरणाशी गट्टी अधिक दृढ झाल्याचं समाधान वाटलं.
शेवटी हा निसर्ग म्हणजेच देव नाही का?

Friday, 12 August 2016

मोहेंजोदरो

बऱ्याच काळाच्या प्रतिक्षेनंतर ‘ द आशुतोष गोवारीकरांचा’ बहुचर्चित सिनेमा मोहेंजोदारो आज प्रदर्शित झाला.सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यात वसलेल्या या प्राचीन नगराभोवती फिरणारी एक काल्पनिक तरीही आजच्या आणि यानंतरच्या काळाशी जोडली जाणारी कथा म्हणजे मोहेंजोदारो.कथा सुरु होते इसवी पूर्व २०१६ ला.निळेची शेती करणारा सर्मन (ह्रितिक) आपल्या काका दुर्जन(नितीश भारद्वाज)बरोबर आम्री नावाच्या गावात राहतो.त्याला लहानपणापासून मोहेंजोदरोला जायचं आकर्षण आहे आणि त्यासाठी त्याचा काका त्याला परवानगी देत नाही.बऱ्याच प्रयत्नांनंतर नीळ विकायला दुर्जन त्याला जायची परवानगी देतो.मोहेंजोदारो मध्ये आल्यानंतर तिथला व्यापार,शेतकऱ्यांच होणार शोषण बघून सर्मन अस्वस्थ होतो आणि राज्याच्या प्रधान असलेल्या महमने(कबीर बेदी) वाढवलेल्या कराच्या निषेधार्थ आवाज उठवतो.महम क्रूर आहे,कपटी आहे,निरंकुश राजसत्तेला शोभणारे(?) सगळे गुण त्याच्यात आहेत.‘पिला धातू’ च्या शोधासाठी त्याने इतरांचा विचार न करता सिंधूवर एक प्रचंड बांध घातला आहे आणि त्याचे दुष्परिणाम मोहेंजोवासियांना भोगावे लागत आहेत.यानंतरचा चित्रपट काहीसा टिपिकल बॉलीपिक आहे.चानी (पुजा हेगडे)चे सर्मनला भेटणे त्यांच एकमेकांच्या प्रेमात पडणे आणि त्यांच्या लग्नाला येणाऱ्या अडचणी याच्या backdropवर सर्मन सत्तेला आव्हान देतो.त्यातच त्याला त्याची ‘सच्चाई’ कळते आणि मग प्रतिशोधाचा रंग गहिरा होत जातो.शेवटी लोकं पेटून उठतात आणि अन्यायी महमला सत्तेवरून दुर करतात,नवीन प्रधान म्हणून सर्मनला नेमू बघतात पण आता लोकांचं राज्य आणू म्हणून तो ते नाकारतो.खरतर इथे चित्रपट संपवणे दिग्दर्शकाला शक्य होते पण गोवारीकरांमधला accomplish दिग्दर्शक इथे कमाल करतो. सोन्याच्या लालसेपायी सिंधुवर बांधलेलं धरण फुटते आणि त्यातून सगळ्यांचा जीव सर्मन वाचवतो.तो वाचवताना VFX चा खुप प्रभावी वापर केलाय,उधाणलेली सिंधूसुद्धा खुप प्रभावीपणे दाखवली आहे.शेवटी नगर बुडते आणि एक नवीन नगराची लोकं सुरुवात करतात.
        Cinematography उत्तम,effects वाखाणण्याजोगे आणि कला दिग्दर्शन भव्य(टिपिकल गोवारीकर), संगीत अर्थातच सुंदर (रेहमानच्या संगीताचे समीक्षण नसते करायचे महाराजा..जीवाचे कान करून ते फक्त अनुभवायचे)कलाकारांचे अभिनय चांगले.ह्रितिकने साकारलेला नायक मनात घर करून ठेवणार,पुजा हेगडे तितकीशी प्रभावी वाटत नाही.कबीर बेदीचा खलनायक आणि अरुणोदय सिंगचा ‘मुंजा’ जमून गेलेत.नितीश भारद्वाज बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसलेत,त्यांच दर्शन सुखावह वाटत..आणि अनेकदा ‘कृष्ण’ आठवायला भाग पाडत.किशोरी शहाणे,सुहासिनी मुळे,शरद केळकर यांनीही चांगल काम केलंय.
       सिंधू संस्कृतीच्या बारीक खुणा टिपून त्यांच केलेलं चित्रण भावणारे.एका बाजूला या चित्रपटात ‘आहे रे विरुद्ध नाही रे’ संघर्ष आहे,आम्हांला नायक का लागतात याचा वेध घेतलाय आणि त्याचवेळी क्षणिक हव्यासापोटी प्रकृतीवर ताण देऊ नका,तो ताण असह्य झाला कि ती तुम्हांला उध्वस्त करेल असा पर्यावरणीय संदेशही मिळतो.एका काल्पनिक कथेला जोडणारे अनेक वास्तववादी पदर अनुभवायचे असतील तर मोहेंजोदारो (चित्रपटगृहात जाऊन) बघायलाच हवा.

Friday, 15 July 2016

दर्शन

छायाचित्र:इंटरनेटवरून साभार)
“ माऊली चला पुढे....”
    सेवेकर्यांच्या ललकारीसरशी रंग पुढे सरकली,जवळपास १८ तास वारकरी रांगेत उभे,नाम्याही त्यातलाच एक.चाळीशीत असेल त्याच वय.गव्हाळ वर्ण,पाच-साडेपाच फुटाच्या आतबाहेरची उंची,वापरून मातकट रंगाच झालेलं धोतर,अंगात सदरा आणि खांद्यावर ठिगळ लावलेली घोंगडी.चालून-चालून पाय सुजलेले.पण अजून चार-दोन तासात विठुरायाचं दर्शन होणार म्हणून सुखावला होता बिचारा.
“ माऊली चला पुढे....” पुन्हा एकदा रंग पुढे सरकली खरी पण नाम्याच्या समोर रांगेत उभा असलेला म्हातारा धाड्कन खाली बसला.कष्टाने भोवल आली त्याला.साठीच्या पार उमर गेली होती,रंग रापलेला होता,डोईला मुंडास बांधल होत.कपाळावर गंधमात्र उठावदारपणे लावलेलं.
“काय हुतय बाबा तुम्हांला?” नाम्याने विचारलं.आजूबाजूची गर्दी स्वत:ची जागा सांभाळत निश्चलपणे उभी होती.
“जीव घुसमटला रे पोर,जेवलो बी न्हाई.”,म्हातारा उत्तरला.
“पाय बी सुजल्यात,लई टाईम झाला उभा हाये इथं,मला बाहीर नेऊन सोडतो का रे लेकरा”,म्हातार्याने पुस्ती जोडली.
    त्याच्या अनवाणी सुजलेल्या पायाकडे बघून नाम्याचं काळीज कालवल,त्यात त्याच्या स्निग्ध ‘लेकरा’ अशा हाकेने तर तो पार विरघळला.
“पण बाहेर जायचं म्हंजी रांगेत पुन्हा उभं राहावं लागेल,दर्शन नाही भेटणार...”काहीशा विचारमग्नतेत त्याने समजावलं स्वत:ला,डोळ्यात दाटलेलं पाणी पुसलं आणि हात जोडून तो रांगेतून बाहेर पडला.
        रात्रीचे बारा वाजून गेले होते.मंदिराच्या बाहेर आल्यावर म्हाताऱ्याने जेवणाचा हट्ट धरला...त्याच्याकडे पैसेही नव्हते.तसे नाम्याकडेही पैसे नव्हतेच पण पोटाला चिमटा काढून भाड्यापुरते पैसे बाजूला काढून त्याने म्हाताऱ्याला चहा पाजला,जेवण दिल.मंदिर आता मागे पडल होत.थोडं पुढ आल्यावर एका शांत ठिकाणी दोघेही आडवे झाले.नाम्याचे पाय एव्हाना चांगलेच ठणकू लागले होते.हवेत अंमळ गारवा होता.खांद्यावरची घोंगडी त्याने म्हातार्याच्या अंगावर टाकली आणि देवाच नाव घेतलं.डोळे मिटले आणि तो झोपेत हरवला.

        कसल्याशा प्रकाशाने नाम्याची झोपमोड झाली.शेजारी झोपलेला म्हातारा जागेवर नव्हता.डोळे किलकिले करून प्रकाश कसला म्हणून त्याने बघितलं तर, शतसूर्यांच तेज ल्यालेलं ‘सुंदर ते ध्यान’ डाव्या खांद्यावर ठिगळ लावलेली घोंगडी घेऊन नाम्याकडे कौतुकाने बघत उभं होत.नाम्याच्या डोळ्यातून संततधार वाहात होती.मंदिरातून अजूनही “चला पुढे....”च्या ललकाऱ्या घुमत होत्या.

Wednesday, 6 July 2016

सुलतान:चित्रपट समीक्षण

सुलतान
         सलमान खानचा बहुप्रतिक्षित सुलतान आज प्रदर्शित झाला.एक पैलवान त्याची महत्वकांक्षा आणि त्याचं प्रेम याभोवती फिरणारी हि कथा.सुलतान(सलमान खान) हा हरियाणातला एक उनाड मुलगा आरफाच्या(अनुष्का शर्मा) प्रेमात पडतो आणि तिला impress करायला म्हणून पैलवानी सुरु करतो.'तुझ्या आयुष्यात काहीच लक्ष्य नाही' म्हणून आरफा त्याला नाकारते तेव्हा जिद्दीने पेटलेला सुलतान खुप कष्ट घेऊन पैलवान म्हणून नावारूपाला येत जातो.अगदी ऑलिम्पिक गोल्ड मेडल सुद्धा जिंकतो पण यानंतर त्याच्या कौटुंबिक आयुष्यात आलेली वादळं आणि त्यातून त्याच कुस्तीला रामराम ठोकण (पुन्हा एकदा) आरफाला  मिळण्यासाठी एका wrestling league मध्ये भाग घेतो आणि शेवटी भारतीय चित्रपट परंपरेला साजेल असा जिंकतो,त्याच कौटुंबिक जीवन सुरळीत सुरु होतं. '...ते दोघे सुखाने नांदू लागले'च्या चालीवर चित्रपट संपतो.
               या चित्रपटाची मुख्य ताकद आहे ती म्हणजे अर्थातच सलमान.पैलवान सुलतान खान दिसण्यासाठी त्याने अपार मेहनत केली आहे.पन्नाशीत अशा पद्धतीची body केवळ सलमानच बनवू शकेन.त्याचं हरियाणवी बोलणं,त्याच चालणं कुस्तीचे असतात ते डाव हे सगळं तुम्हांला खिळवून ठेवतं.अनुष्का शर्माचा अभिनयही चांगला आहे.Punjabi girl साकारण्यात तिची हातोटी तिने पुरेपूर वापरली आहे.म्हणजे आजवरच्या बऱ्याच चित्रपटात तिने साकारलेल्या पंजाबी मुलीपेक्षा आरफा वेगळी आहे.रणदीप हुडाला काम छोट आहे पण जे मिळालंय त्याच त्याने सोनं केलंय,खरं कौतुक करावं वाटतं अमित सिधचं,चित्रपट पुढे नेण्याचं काम तो लीलया करत जातो.परीक्षित सहानी साहेबांचं दर्शनही सुखावह ठरत.विशाल-शेखरनी गाणे चांगले बनवलेत,cinematographही उत्तम.कुस्तीचा थरार अक्षरशः उभा राहावा म्हणून cameramanला द्यावं तेवढं श्रेय कमीच आहे.चित्रपट प्रवाही झाला आहे आणि प्रभावी देखील त्याचा वाटा अर्थातच अली अब्बास जफर या दिग्दर्शकाचा.
             एकूणच सलमान एके सलमान आणि सलमान दुणे दोनशे कोटी हे समीकरण सुलतानाही कायम ठेवेल. यात शंका नाही.