Tuesday, 26 January 2016

हुतात्म्याची आई

त्या घरातून
एकेदिवशी
हुतात्म्याची अंत्ययात्रा निघाली होती,
तिरंग्यात लपेटून,
हजारांच्या गर्दीत,
त्याला खांदा द्यायच्या उत्साहात
शेकडाभर लोकांचे अंगरखे फाटले,
कित्येकांच अंग खरचटल,
भारत माता कि जय
इन्कलाब जिंदाबाद,
इंग्रज सरकार मुर्दाबाद,
च्या घोषणेत हुतात्म्याच्या आईचं रुदण
लोपलं गेलं होत.
तिच्या अश्रूंचा पुर,
फुल,हार आणि बत्ताशाच्या सरीमध्ये
लपला गेला होता.
लोक मोठ्याने गरजले होते,
तुझं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल.
गल्ली मोठ्या अभिमानाने दिपून गेली होती.
त्याच घरातून
तीस वर्षांनंतर
हुतात्म्याच्या आईची अंत्ययात्रा निघाली
तिरंग्यात न लपेटलेली
(तो खास लोकांसाठी राखीव आहे आता)
फक्त चार खांद्यांवर
राम-राम च्या जुनाट गजरात;
चर्चा होती म्हातारी निराधार होती,
जीवनाच्या कष्टांतून सुटली,
गल्ली मोठ्या समाधानात
सुस्कारे सोडत होती.

हरीवंशराय 'बच्चन' यांच्या 'शहीद कि माँ'चा स्वैर भावानुवाद
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Saturday, 23 January 2016

महानायक

अनंताच्या वाळवंटात,
एका चिरकाल रात्री,
हातात हात घेऊन चालले होते जेव्हा
साक्षात काळ आणि महानायक,
नायकाचा हात हातात घेत,
काळ म्हणाला त्याला,
"बघ,माझ्या सामर्थ्यापुढे हरलास तु शेवटी,
माझ्याच तालावर नाचत,
वाकत,
झुंजत,
झुकवत राहिलो मी तुला,
तुझं जिंकणं,हरणं होत माझ्याशीच संलग्न,
माझीच पाऊले उमटतात इतिहासात खोलवर आणि तुझी ओळखही होते
केवळ माझ्याचमुळे"
त्याचा हात हलकेच दाबत नायक म्हणाला
"तुझ्या अनाभिषक्तत्वाला असतो
अभिशाप चिरंतनाचा,
तुझ्याच छातीला भगदाड पाडून आम्ही रचतो
कर्तृत्वाचे मनोरे,
रचतो इतिहास अश्रू,घाम नी रक्त सिंचून....
आम्ही असतो म्हणून तुझं अस्तित्व...."
अंगावरची शाल सारखी करत,
वाळूत रुतलेली पाऊले पाहिली जेव्हा दोघांनी,
तेव्हा कुठेच नव्हता काळ
उरला होता केवळ महानायक,
काळ आणि महानायक
दोघे इतिहासात केव्हाच एकरूप झाले होते..

Saturday, 9 January 2016

देव

भर थंडीत
डोंगरावरच्या देवळात,
भक्तांच्या जमलेल्या गराड्यात,
देवाला म्हणालो मी,
"हे सर्वशक्तीमान जगनियंत्या,
मी दास आहे तुझा,
कर मला मुक्त माझ्या पापाच्या भारातून"
काहीच उत्तर न देता
देव मख्ख होता.
पुढल्यावेळी दुपारी
लोटांगण घालून चढलो मी डोंगर
हात जोडून,नवसांची लाच देत
पसरला पदर,
"बापा, एवढं मागणं पुरव,
मी पुत्र ना तुझा?
बोल एकदा माझ्याशी"
चेहऱ्यावरची रेषही न हलवता,
देव पुन्हा गप्प होता....

आज संध्याकाळी,
जरा सहजच गेलो
देवाची विचारपूस करावी म्हणून,
आस्तिकांच्या आतिथ्याखाली दबलेला,
त्याचा चेहरा बघवत नव्हता....
ना हात जोडले
ना काही मागितलं त्याच्याकडे,
निघालो तसाच,
डोंगर उतरताना,
आकाशातील ढगांसवे
देव माझ्याशी बोलत होता.

Saturday, 2 January 2016

मा.संमेलनाध्यक्ष

मा.संमेलनाध्यक्ष
           ८९ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले अभिनंदन करावे की 'देशाचा प्रथम नागरिक कोण?' हे माहिती नसलेला अध्यक्ष संमेलनाला मिळाला याच खेद बाळगावा या संभ्रमात मी आहे.आपला अभ्यास मोठा,समीक्षक,कवी,नाटककार म्हणून आपली कारकीर्द मोठी म्हणूनच या साऱ्या पार्श्वभूमी आपले विधान निंदास्पद ठरते.गोध्रा दंगल घडून आता एक तप उलटून गेले,त्यानंतरच्या चौकशीच्या फेऱ्यातुन नरेंद्र मोदी निर्दोष सुटले,इतकच नाही तर विधानसभेत आणि नंतर लोकसभेतही त्यांना बहुमत मिळाल त्यामुळे हा मुद्दा निकाली निघतो.बर कुणी गोध्राचा विषय काढला तर भाजपा समर्थक १९८४ च्या शिख दंगलीकडे बोट दाखवतात,अजुन काही लोक ते बोट गांधी हत्येनंतरच्या दंगलीपर्यंत मागे नेतात,त्या वादात आता फारस तथ्य राहील नाही त्याचा उगीच वितंड होत राहील.
         मा.पंतप्रधानांचा उल्लेख आपण एकेरीने केलात.त्यातला प्रेमाचा उमाळा आम्ही समजू शकतो.पण घटनात्मक दृष्टया इतक्या उच्चपदस्थ व्यक्तीला एकेरी संबोधने अयोग्य आणि अप्रस्तुत.निदान आपण जितक्या मताधिक्याने संमेलनाध्यक्ष झालात त्याच्या दुपटीपेक्षा जास्त जागा घेऊन मोदी पंतप्रधान झालेत हे भान तरी (चारचौघात) असायला हवे होते.
       आपण भारत-पाक संबंधाचे जाणकार म्हणून ओळखले जात नाहीत,त्यामुळे ती चर्चादेखील अर्थशून्य ठरते. तळहातावर जीव,शोकसभा हे आपल्या सैल जीभेने तोडलेले तारे असतील केवळ शाब्दिक बुडबुडे ठरतात.
        साहित्यिकाचा पिंड राजकारण्याचा नसतोच,त्यामुळे त्यांनी राजकारण करू नये.याउलट राजकीय नेत्यांनी साहित्यिक गुणधर्म शिकायला हवेत,राज्यकर्त्याला ते सर्जनशील बनवतात.साहित्य संमेलनाच्या मंडपात तरी राजकीय चपला घालून कुणी जाऊ नये.त्याच पावित्र्य अबाधित राहायला हव.