Monday, 27 October 2025

सुशांत सिंह राजपूत

सुशांतसिंग मृत्यू प्रकरणाची अवस्था पुलंच्या 'म्हैस'सारखी झाली आहे, "ती हत्या आहे की आत्महत्या हे कधीच निष्पन्न होणार नाही." असं सांगणारे देशातील अनेक तपासांचा अनुभव असलेले 'बगुनाना' तुमच्या आसपास असतात,मृतदेहाच्या केवळ फोटोवरून "ती आत्महत्या नसून तो खून कसा आहे,o mark-v mark याने फरक किती पडतो."  हे समजून सांगणारे अनेक forensic experts ही 'होमेपदी' डॉक्टर सारखे चॅनेलवर आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करत आहेत."सुशांतला न्याय मिळायला हवा पण म्हणून मीडिया ट्रायल गरजेची नाही."असा उपदेश देणारे आणि सुबक ठेंगण्या प्रसिद्धीकडे बघत समेवर येताना "Law should take its own course." म्हणणारे मधु मलुष्टेही सहज सापडतील.संजय राऊतदेखील उस्मानशेटसारखे चार-दोन टाळकी हाताशी धरून काहीतरी पाडापाडी करतात.(उखाड दिया वैगेरे..) मग राऊंतांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून मराठी कलाकार सिनेमांसाठी अनुदानाची जांभळे मिळवू बघतात. 


      अर्णब गोस्वामी मात्र धर्मा मांडवकर असल्या सारखा भांडतोय, सुशांतच्या PM report वर आत्महत्या शेरा मारणाऱ्या कुपरच्या 'शिवराम गोविंदला' त्याने अडवून धरलंय.त्याच्या जोडीला अनेकांनी गावकऱ्यांसारखी आपली संयुक्त फळी उभारली आहे,त्यात कंगनाही आहे 'सुपडू सुतारा'सारखी एकमेकांशी संबंध नसलेल्या गोष्टींवर ती 'साक्ष' देतीय. 

         पोलीस वरिष्ठांच्या आज्ञेत राहून ऑर्डरली सारखं 'आमाला पावर नाय.'म्हणण्यात धन्यता मानत असताना CBI पोलीस साहेबासारखी धावून आली खरी पण 'खादी' घातलेल्या बाबासाहेब मोरेंना नक्की कुठल्या निष्कर्षात रस आहे याची खात्री न झाल्याने ते आस्ते कदम चालले आहेत.शेवटी आरुषी तलवार,सुनंदा पुष्कर प्रकरणाप्रमाणेच मिडिया,राजकारणी आणि तपास यंत्रणा अशा आडोशाच्या तिन्ही खाटा उधळून सुशांतच्या आत्महत्येची ( वा हत्येची ) ही म्हैस स्वत:च्या पायांनी चालती झालेली असेल.



Wednesday, 2 October 2024

गांधी आणि नेत्रुत्व

      १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत देशातील सर्वसामान्य माणसाला  स्वातंत्र्यचळवळीविषयी फारशी आस्था नव्हती.कारण शतकानुशतके अमुक राजा-तमुक सुलतान; फलाना बादशाह-ढीमका नवाब हाच इथला शासकवर्ग होता,आता आपल्यावर राज्य करणारा इंग्रज नवा शासक आहे उद्या तो जाऊन दुसरा येईल ही सामान्य माणसाची प्रारंभिक धारणा होती.देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे आद्य नेते देखील माजी सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी किंवा त्यात हितसंबंध गुंतलेले पदाधिकारी,संस्थानिक वैगेरे मंडळी.या काळात देशातील समाजापासून विभक्त समजल्या जाणाऱ्या आदिवासी समुदायाच्या चळवळी सोडल्या तर स्वातंत्र्य गेल्याचे दुःख झालेला वर्ग हा प्रामुख्याने अभिजन आणि सत्ताधारी होता.१९ वे शतक सरता सरता देशात ब्रिटीश धार्जिणा जमीनदारांचा एक आणि मेकॉलेच्या शिक्षणाच्या गंगेने पावन झालेला दुसरा मध्यमवर्ग असे दोन वर्ग उदयाला आले.हे दोघेही वर्ग ब्रिटिश सरकारच्या मेहेरबानीला धन्यवाद देत राणीच्या उदंड आयुष्याची कामना करत होते.




        दुसरा सुशिक्षित वर्ग स्वातंत्र,समता बंधुतेच्या  कल्पना मांडत होता. त्या कल्पना उदात्त असल्या तरी त्यासाठी व्यापक जनमानस तयार नव्हते. जनमत निर्मितीच्या बाल्यावस्थेत न्या. रानडे, सुरेंद्रनाथ बनर्जी, दादाभाई नवरोजी यांनी केलेल्या प्रयत्नांना लोकमान्य, लालाजींच्या काळात बाळसे धरले आणि ते जनमत पुर्ण क्षमतेने गांधीजींवर विश्वास टाकून त्यांच्या मागे उभे राहिले.या काळात देशात एकच वेळी साम्यवादी,समाजवादी, क्रांतिकारी, हिंदुत्ववादी, मुस्लिम विभाजनवादी, सामजिक समानतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्या दलित चळवळी अस्तित्वात होत्या.त्यांचे नेते लोकप्रिय होतेच शिवाय बुद्धिमान आणि सुशिक्षितही होते तसे असूनही स्वातंत्र्य चळवळीचे एकमुखी नेतृत्व महात्मा गांधींकडे राहिले आणि गांधींनंतरही भारताच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव टिकला.

यामागे गांधीच्या मोहिनी इतकीच त्यांच्या पूर्वसुरींनी केलेली वैचारिक मशागत कारणीभूत आहे.त्यामूळे महात्मा गांधीजींना २० व्या शतकातील भारताच्या सदसद्विवेकबुद्धिचा एकल प्रतिनिधि म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

Tuesday, 17 October 2023


मीरा बोरवणकर २०१७ साली निवृत्त झाल्या त्यावेळी त्यांनी Leave of Life नावाचं आत्मचरित्र लिहिलं आणि विश्वकर्मा प्रकाशनानं ते प्रकाशितही केलं. आता त्यांनी 'मॅडम कमिशनर' नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे, ते PAN नावाच्या उच्छभ्रू प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. दोन्ही पुस्तकात फारसा फरक नाही पण महाराष्ट्रातील बदललेली राजकीय समीकरणं आणि बोरवणकरांच्या नव्या आत्मचरित्राची वाढलेली पानं याचा काही संबंध आहे का ? केवळ १७० पानं जास्त लिहिण्यासाठी बोरवणकर ६ वर्ष वाट बघत होत्या ? त्या शासकीय अधिकारी असताना ज्या गोष्टींची वाच्यता करू शकत नव्हत्या त्याची वाच्यता निवृत्तीनंतर नेमकी आत्ताच का केली ?भूखंड-बिल्डर-डेव्हलपर-राजकारणी-नोकरशहा हा नेक्सस बोरवणकर यांना आत्ताच स्पष्टपणे का जाणवला ? स्वतः CBI च्या आर्थिक गुन्हे शाखेच्या उच्चाधिकारी असलेल्या बोरवणकर यांनी साधलेलं टायमिंग मजेशीर आहे...

विशेषतः सुप्रिया सुळे लोकसभेत आमच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करा म्हणणं आणि बोरवणकर यांनी  पुण्याच्या तत्कालीन पालकमंत्र्यांबाबत संशय निर्माण करणं यातला अदृश्य संबंध तपासायला हवा. 

नैतिकता ही कालातीत संकल्पना असली तरीही तुम्ही कधी ती प्रकट करता त्याला फार महत्व आहे.... 

Thursday, 27 July 2023

अग्निपंख

रामेश्वरम जवळच्च्या त्या समुद्रात 
आपली छोटी नाव वल्हवताना तो लडका बघत होता एक ख्वाब.....
आसमान कवेत घेण्याचं
पंछीसारखं उंच उडायचं…
हाताचे पंख करून किनाऱ्यावरून सैरावैरा धावताना,
तेच ख्वाब तरळायचं हमेशा त्याच्या नजरेत....
एक दिवस बघता बघता घेतली त्याने उडान,
क्या स्वतःचे दानापाणी यही है आसमान...?
एक वकत आकाशाकडे बघून स्वतःलाच बजावलं त्याने
“नही नही अभी बहोत उंचा उडना है”
पंख फडफडत,जी-जान लावून पुन्हा एक कोशिश,
थोड्या वेगळ्या उंचीवरून,त्याने पाहिली दुनिया..
चार-दोन पुरस्कार,पाच-सहा मानसन्मान 
यही तो है ना आसमान...?
“नाही,अजून थोडसं वर गेलो कि आलंच”
समजावलं त्याने स्वत;ला
पुन्हा एक जोरदार प्रयत्न...अन् तो पोहोचला,
त्याच्या अग्निपंखाच्या जोरावर
त्या उंचीवर,
जिथे पोहोचतात फारच कमी लोकं....!
खाली असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आता तो विणत होता,
त्याच स्वप्नाचं जाळं,
जे कधी पाहिलं होत त्याने...आसमान कवेत घेण्याचं
हे करता करता जेव्हा त्याने अखेरचे डोळे मिटले ,
तेव्हा त्याच्या नजरेतल्या स्वप्नांनी हा जहाँ रोशन झाला होता...
कधी काळी आकाशाला कवटाळू बघणारा माणूस,
आज स्वत:च एक नया आसमान झाला होता..!

Thursday, 30 March 2023

राम आणि तुलसी

"ए पळ पुढे....अपशकुनी कार्ट कुठलं...!"

दारात भिक्षा मागायला आलेल्या त्या सात वर्षांच्या घराविना पोराला सगळेच असं हटकायचे.जन्मतःच मातृप्रेमाला पारख्या झालेल्या त्याला अपशकुनी म्हणून बापानेही त्यागलं अन् बापही परलोकी गेला.वयाच्या अवघ्या दहाव्या दिवशी अनाथ झालेल्या या पोराला त्याच्या दाईने सांभाळलं.चुनिया तिचं नाव.गरिबी असली तरी पोटातली माया तिला स्वस्थ बसू देईना.शकुन-अपशकुनाच्या गोष्टी मनाला स्पर्श करेनात.तिनं त्या बाळाला घरी आणलं आणि त्याचा सांभाळ करू लागली.
बाळ दिसा-मासाने वाढत होता पण आजुबाजुची लोकं त्याला जवळ करत नव्हती.चुनियाचा नवरा तिला ओरडायचा, "कशाला आणलंस त्याला इथे..." 
सासू बोट मोडत,"आईबापाला गिळलं तसं आम्हांला गिळेल हो हे पोर...." म्हणायची. 

अन एके दिवशी घात झाला.... 
नदीवर पाणी आणायला गेलेल्या चुनियाला साप चावला आणि ती गेली.तिच्या नवऱ्याने त्या पोराला घराबाहेर काढलं. 
तेव्हा पासून दोन वेळच्या जेवणासाठीही तो कोवळा जीव पराधीन झाला.भिक्षांदेही करावी म्हटलं तर कुणी भिक्षाही देईना. 
भुकेने कासावीस झालेल्या घरादाराविना-अन नावविना त्या पोराला एक मंदिर दिसलं.रामाचं मंदिर.
देवळाच्या पडवीत बसून आसवं ढाळत तो भुक मारू लागला. 
देवळाच्या महंताला त्याची दया आली,नरहरीदास नाव त्यांचं. त्यांनी त्याला दुध दिलं-फळ दिली.नाव गाव पुसलं....
नावच नव्हतं तर सांगणार काय...!
लोकांच्या बोलांनी दुखवलेला ते पोर नरहरीदासांना म्हटलं, "माझ्या जवळ नका येऊ बाबा,माझी काळजी घेणारी लोकं जगत नाहीत जास्त.... मी अपशकुनी आहे ना म्हणून"
नरहरीदास हसले आणि म्हणाले "सगळ्या जगाचा पालनकर्ता तो रामचंद्र.त्याला ना जन्म न मृत्यू....तो सर्वव्यापी आहे.त्याला शरण जा बाळा,तो घेईल तुझी काळजी..."

"अन तो मला कसा भेटेल...?" त्या उपेक्षित जीवाने नरहरीदासांना विचारले. 

ये सांगतो म्हणून नरहरीदासांनी मुलाला त्रयोदशाक्षरी कानमंत्र दिला...श्रीराम जयराम जयजयराम.

मुलगा आनंदला..

नरहरीदास म्हणाले,"तुला नाव नाही ना रे...आजपासून तुझं नाव रामबोला.."

देवळातल्या रामाच्या चरणाला मिठी मारून मुलगा रडू लागला. 
अनाथ असण्याचे शल्य संपले,
आजपासून तात-माता-बंधू-सखा सगळं सगळं श्रीराम....
त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. 

रामबोलाला राम मिळाला,आता फक्त स्वतःसाठी नाही जगाला रामकथा सांगायला,विकल मनांना धीर द्यायला.तुम्ही एकटे नाही तर शर-चाप धरलेला राम पाठीशी उभा आहे हे सांगायला.

'दीन दयालु विरद संभारी ।
हरहु नाथ मम संकट भारी ।। म्हणायला. 

रामचरितमानस रचायला....
त्यासाठी रामबोलाचा तुलसीदास होणं अजून बाकी होतं.....

Thursday, 16 March 2023

सडक

हि तशी फार पुर्वीची गोष्ट नाही.अगदी आत्ताआत्ताची आहे.... 
ग्रामीण भागात 'टार-रोड' झालेले नव्हते,पायवाटा-कच्च्या सडका आपला आबा राखून होत्या.बैलाच्या गळ्यातील घुंगरमाळांच्या तालावर बैलगाडी धुळमाती उडवत चालायची.चकाऱ्यांशी सलगी करत छकडा धावायचा कधी खकाना उडवीत एखादा उमदा घोडा चौखूर उधळीत जायचा.चरायला गेलेली गुरं-वासरं मावळतीला धुळमाती अंगाला लेवूनच येत असत.पुढे काळ बदलला,भावक्या कज्जे लढायला 'राजदूत' वरुन जाऊ लागल्या,तालेवार ताडपत्री लावलेल्या 'जीप' मधून रुबाब मारायला लागले गावातली कच्च्या सडका मायबाप सरकारच्या कृपेने पक्क्या व्हायला लागल्या.ट्रॉलीभर ऊस फॅक्टरीला जाऊ लागले गावात मायंदळ पैसा येऊ लागला,शेती सुधारायला लागली,नवे नवे प्रयोग व्हायला लागले. 

        शहरातल्या माणसांना यातलं काही माहिती नव्हतं,पण त्यांना खेड्यातल्या आयुष्याचं मोप कौतुक.सिनेमा-कादंबऱ्यांनी ते वाढवलेलं.मग ऍग्रो-टुरिजम' सुरू झालं.चुलीवरच्या भाकऱ्या,झुणका,पेरू-चिंचा जोडीला रानातली गार सावली अन अंगावर धूळ उडवीत बैलगाडीतुन चक्कर......!
        पण खर्चाची गणितं सगळ्यांनाच जमतात असे नाही,इथं पुणे महानगरपालिका नागरिकांच्या मदतीला येते,म्हणजे कर्ज वैगेरे देऊन नाही बरं,गावभरचा रस्ता खणायचा म्हणजे उडणारी धुळ लोकांना agro tourism ची आठवण करून देईल.उडणारा फुफाटा लोकांना गावात गेल्याचा आनंद मिळतोच शिवाय चौकात चौकात खोदलेला रस्ता सारी खुदाई एक तरफ या पारंपरिकतेलाही छेद देणारा आहे.एकूणच काय तर एका थोर कवीने किती यथार्थ वर्णन केलंय,
        "क्यूँ जाए एग्रो-टूरिजम के लिए गांव में,
        कुछ दिन तो गुजारिए पुणे मनपा की छाँव में ।"
      
        

Wednesday, 1 March 2023

कसबे में कौन बा ?

खरं तर शहरातील मतदारसंघात कामं आपोआप होतात.आरमोरी-जत सारख्या मतदारसंघातील लोकांना शिक्षण-रस्ते-वीज-आरोग्य-पाणी यांसारख्या मुलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो तो शहरातल्या मतदारसंघाच्या नशिबी नसतो.कसब्याबाबतही हेच आहे.शहरातील दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टींकडे महापालिका लक्ष पुरवते,स्मार्ट-सिटी असल्याने पुण्यात एकच रस्ता अनेक वेळा खणायला आणि परत त्याचे डांबरीकरण करायलादेखील पैसा आहे.मेट्रोचे काम ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाडीच्या गतीने का होईना पण पुढे चाललेले आहे.रस्ते झाडले जातात,कचऱ्याचे ढिग साचत नाहीत.एकुणच काय तर पंचेंद्रियांना इथल्या विकासाचा अनुभव येतो.खासदारकी, आमदारकी, महापालिका एवढ्या सगळ्या सत्ता केंद्रावर भाजपाची मजबूत पकड आहे.तरीही एका लहान पोटनिवडणुकीसाठी दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोनदा पुण्यात येऊन गेले.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तळ ठोकून बसले.स्वतःचा मतदारसंघ नसलेले चंद्रकांत पाटील रासनेंना निवडून द्या म्हणून पायपीट करत होते.१९९५ पासून भाजपचा निर्विवाद गड असलेल्या कसब्यात भाजपाला एवढे परिश्रम घ्यायला लागणं खरं तर भाजपा बॅकफुटवर गेल्याचं लक्षण होतं.


फडणवीसांच्या रोड-शो मध्ये 'अयोध्या तो झांकी हैं,पुण्येश्वर अभी बाकी हैं..'च्या घोषणा दिल्या गेल्या.शेवटी नाही म्हटलं तर शेवटचा प्रयत्न म्हणून हिंदु-मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयोग (आणि त्याला पवारांनी दिलेली साथ ) भाजपाची अस्वस्थता दाखवतंय.२००९ ला बापट आणि मनसेच्या धंगेकर यांच्यात केवळ  ८१६४ मतांचं अंतर होतं.काँग्रेसकडून रोहित टिळकांनी ४६००० मतं मिळवली होती,मतविभाजन झालं म्हणून बापट निवडून आले.त्यानंतर दोन्ही निवडणुका भाजपने २५००० च्या फरकाने जिंकल्या आहेत.२०१४ ला मनसेकडून लढताना धंगेकरांना २५९९८ मतं मिळाली होती, काँग्रेसला ३१३२२,राष्ट्रवादीला १५८६५.यावेळी मतविभाजनाची संधी नाही, काँग्रेस-राष्ट्रवादी-उबाठा गट एकत्र आहेत.अशावेळी धंगेकर रासनेंना धुळ चारणार की कसब्यातील भाजपचे 'सुवर्णयुग' रासने कायम ठेवणार हे उद्या स्पष्ट होईलच.
एक नक्की २+२ ची बेरीज करण्यासाठी कॅल्क्युलेटर वापरणाऱ्याला हुशार नक्कीच म्हटलं जात नाही.भाजपची अवस्था काहीशी अशीच आहे.