उद्या पुन्हा नवा दिवस,
पण पान मात्र जुनचं ,
चुरगळेलेलं,
मळलेलं,
पेन्सिलच्या रेघोट्या,
हायलाईटरच्या खुना,
Bookmarks चिकटवलेलं.
व्यक्ती तितक्या प्रकृती,
विद्यार्थी तितकी पाने.
एका अशाश्वताकडून दुसऱ्या अशाश्वताकडे जाणारा हा प्रवास,
निकालाची फिकीर न करता पुढे जाणारा,
उरणार नाही मारणार नाही, घेतला वसा टाकणार नाही
म्हणत ही गर्दी पुन्हा दिसेल.
मानामोडून अभ्यास करत,
ढेकणांच्या सहवासात रात्री घालवत,
'लक्ष्मीकांतची' पारायणं करत,
चौकात १/२ चहा मारत,
पाठीला जड सॅक अडकवून,
झेरॉक्सवाल्याचा उंबरठा झिजवत.
हि गर्दी जमत राहिलं,
नवे लोकं येत राहतील.
मंडप-दीपमाळा-महिरप -कळस,
बदलत जाईल काळाबरोबर,
पण मखरातला देव मात्र constant राहतो,
पिढ्या बदलतात, तरी यात्रा भरतच राहते.....!
- निखील कुलकर्णी
Monday, 22 March 2021
यात्रा
Sunday, 21 March 2021
कविता
उगीचच कागदावर
माराव्यात चार रेघोट्या,
शाईने डबडबलेलं पेन शिंपडावं
पांढऱ्या-कोऱ्या कॅनव्हासवर.
मग त्या ओघळलेल्या शाईच्या थेंबातून,
जन्माला येऊ लागतात कविता.
हातात हात धरून,
फेर मांडून नाचू लागतात,
उगाचच.
गोल गिरक्या घेत कधी,
आकाशाला चुंबू पाहतात.
जमिनीवर कोसळून,
धाय मोकलून
कधी कधी रडू कोसळतात.
पडलेल्या त्या थेंबातूनच पेटून उठतो अंगार कधी,
मग माणसांचे संगर जिवंत होतात
आणि अन्यायाला वाचा फुटते.
पेटतात वणवे ओल्या सच्छिद्र लाकडातून,
आणि शांतरस पिऊन विझतातसुद्धा आलिप्तपणे.
कॅनव्हासवर शिंपडलेल्या ओघळातून,
साकारत जातं एक-एक चित्र
मुर्त-अमूर्त भावनांचं.
अंतरीच्या वेदनांच्या थारोळ्यात अंकुरलेल्या या जीवलाच,
तुम्ही-आम्ही कविता म्हणतो.
-निखील©
(जागतिक कविता दिनानिमित्त......)
Subscribe to:
Comments (Atom)