Friday, 30 October 2020

आलम लेखक आणि कवीवर्गाने चंद्रावर जितका अन्याय केला आहे तितका आजपर्यंत चंद्रावर गेलेल्या अंतरळवीरांनीदेखील नाही केला.चंद्र हा स्त्री की पुरुष यावरच खरा संभ्रम आहे. म्हणजे बघा,
'ये चांद सा रोशन चेहरा'( एस. एच. बिहारी) किंवा 'चौदहवी का चांद हो'(शकील बदयुनी) सारख्या गाण्यांत चंद्राची तुलना प्रेयसीच्या चेहऱ्याशी कवी करतो. तर 'चांद मेरा दिल (मजरूह सुलतानपुरी),गली में आज चांद निकला' (आनंद बक्षी)यात चंद्राला पुरुषपणा चिकटवला. त्यामुळे चंद्र हा नवरंगच्या 'अरे जा रे हटे नटखट...' मधला वेष घेऊन अवकाशात वावरत असावा असं मला अनेकदा वाटतं.
गदिमांसारख्या सारस्वताने 'सावळा गं रामचंद्र,रत्नमंचकी झोपतो,त्याला पाहता लाजून,चंद्र आभाळी लोपतो' मध्ये चंद्राची तुलना श्रीरामाच्या मुखकमलाशी केली,माउलींनी पसायदानात डाग नसलेला, अलांच्छन चंद्रमा मागितला. तर '...शाळा चांदोबा गुरुजींची' सारख्या बालगीताने चंद्राला मास्तर केले.याउपर 'चांदोबा चांदोबा भागलास का? ' किंवा
'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई..'ने त्याच्याशी मामाचं नातं जोडलं.

सगळ्यात जास्त moods चं variation उर्दू शायर लोकांनी दाखवलं !इब्न-ए-इंशाचं,
'कल चौदहवी की रात थी,
शब भर रहा चर्चा तेरा,
कुछ ने कहां ये चांद हैं,
कुछ ने कहां चेहरा तेरा । 'मधला romance असो किंवा
परवीन शाकिरचं,
'इतने घने बादल के पीछे
कितना तन्हा होगा चाँद '
मधलं काळजाला भिडणारे एकाकीपण असो,वा

'चाँद का हुस्न भी ज़मीन से है ,चाँद पर चाँदनी नहीं होती |'  इब्न-ए-सफीच्या या शेर मध्ये व्यक्त होणारं pride असो.

चंद्र सगळीकडे आहे.बाल्य, तारुण्य आणि वृद्धत्व या तीन कोपऱ्यात चार पुरूषार्थ व्यापून उरणारा चंद्र मोठा की celestial entity असलेल्या एका निर्जव उपग्रहाला सजीवत्व देणारे साहित्यिक मोठे ? हा न सुटणारा प्रश्न आहे तो तसाच न सोडवता राहू दिलेला बरा.

Saturday, 10 October 2020

१९४२ चालू होतं,देशात क्रांतीचं वातावरण पेटलेलं होतं. हरिवंशराय तेव्हा अलाहाबादला राहायचे,मागच्याच वर्षी १९४१ ला लग्न झालं होतं त्यांचं तेजी बरोबर.११ ऑक्टोबरला त्यांना मुलगा झाला.हरिवंशराय यांचा मित्रपरिवार मोठा,सगळे घरी येऊन बाळाला बघून जात होते.त्यावेळी सुमित्रानंदन पंत हरिवंशराय यांचे शेजारी राहत. सुमित्रानंदन म्हणजे हिंदी काव्यातील बडी असामी.त्यांनी बाळाला पाहिलं,ते मोठ्या शांतपणे झोपलेलं होतं डोळे मिटून. पंत म्हणाले "किती शांतपणे झोपलाय हा,जणु ध्यानस्थ अमिताभच." तेजी बच्चन यांना आवडलं ते नावं, त्या म्हणाल्या मुलाचं नाव अमिताभ ठेऊयात.
"क्रांतीने भारलेल्या वातावरणात जन्माला आलाय,मी म्हणत होतो मुलाचं नाव इन्कलाब ठेवावं." हरिवंशरायांनी आपली इच्छा सांगितली."अमिताभ हे बुद्धाचं नाव आणि बुद्धापेक्षा मोठा इन्कलाब कोण आहे? सुमित्रानंदन म्हणाले.
"जर इन्कलाब त्याच्या मनात असेल तर आणेलच की तो इन्कलाब." पंतांनी पुस्ती जोडली आणि तिघेही हास्यात रमले.
त्या लहान बाळाला त्याचं नाव मिळालं,ते बाळ होतं अमिताभ 'बच्चन'

- निखील©