Monday, 6 November 2017

उमलता 'कमल'दल...

    तामिळनाडूचं राजकारण हे उत्तरेतील राजकारणापेक्षा वेगळं. पेरियार यांच्या जस्टीस पार्टीला मोठं जनसमर्थन होतं, त्यांचे अण्णा दुराई यांनी ते व्यवस्थित राजकीय चातुर्याने निवडणुकीच्या राजकारणात वापरलं आणि पक्षाचे नावच बदलले. हा नवीन पक्ष म्हणजे द्रविड मुनेत्र कळघम; द्रविडांच्या उद्धारासाठीची संघटना.दलित-पीडितांच्या मागण्यांसाठी, न्याय-हक्कांसाठी लढणारा पक्ष म्हणून द्रमुक उदयाला आला,निवडणुका जिंकल्या. स्वतःच्या ताकदीवर बहुमताने विधानसभा जिंकणारा तो देशातील पहिला पक्ष यावरून अंदाज येईल त्याच्या ताकदीचा.
      अण्णा दुराई यांच्या नंतर पक्षाची धुरा करुणानिधी यांच्याकडे गेली आणि सत्तासंघर्षाच्या या टप्प्यावर करुणानिधी यांनी स्वतः पक्षात आणलेल्या, त्यांच्या जीवलग मित्राने, एम जी आर याने वेगळी चूल मांडली  १९७७ साली.अण्णा द्रमुक या नावाने पक्ष काढून. पक्ष बदलला पण मागासवर्गीय जातींच्या हक्कासाठी आपली भूमिका आहे हे एमजीआर यांनाही सांगायचे होते.एमजी आर यांच्यानंतर पक्ष ताब्यात घेतला जयललिता यांनी. मग तामिळनाडू जनतेने कधी करुणानिधी,कधी जयललिता अशी भाकरी फिरवत सत्तांतरे केली. त्या prediction ला धक्का लावून  यावेळी जयललिताबाई सत्तेत आल्या होत्या,त्याच वर्षी त्या निवर्तल्या. त्यांच्यानंतर पक्षात जनमान्य नेतृत्व नाही.
    दुसरीकडे करुणानिधी आणि द्रमुक फक्त त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित आहे. कौटुंबिक कलह आहे,त्यातूनच अलगिरी यांना पक्ष सोडावा लागला. स्टॅलिन यांच्या खऱ्या क्षमता अजून गुलदस्त्यातच आहेत.
       थोडक्यात सांगायचं झालं तर तामिळनाडूचं राजकारण गेली ५० वर्षे द्रविडकेंद्री आहे अगदी ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या जयललिता यांनी अंत्यविधीला दफनविधीचा पर्याय निवडला यावरून त्याची व्याप्ती लक्षात येते.एका बाजूला वैचारिक आणि दुसऱ्या बाजूला नेतृत्वाची अशी समांतर पोकळी भरण्यासाठी कमल हसन सरसावतोय,त्याच्या विधनांना राजकीय गरज यांपेक्षा जास्त महत्व नाही. हे वास्तव समजावून घ्यायला हवं.
       

 

Sunday, 22 October 2017

दिवाळी के बाद

दिवाळी येण्याची जितकी आतुरतेने वाट बघावी त्यापेक्षा घाईने ती निघून जाते याची हुरहूर जास्त जाणवत राहणारी असते. साधारणपणे दसऱ्यानंतर दुकाने सजू लागतात,फटाक्यांचे आवाज यायला लागतात,फराळाचा सुवास हवेत तरळायला लागतो आणि दिवाळी आल्याची जाणीव व्हायला लागते.हल्ली या यादीत ऑनलाईन सेल्स,नवनवीन ऑफर्स,दिवाळी स्पेशल अमुकतमुक यांचाही समावेश करावा लागेल.आमच्या एका हौशी मित्राने तर दिवाळी स्पेशल रेनकोट-छत्र्यांचे दुकानही टाकले होते.इतकंच काय तर तिचं गाणी,तेच गायक,तेच सभागृह(आणि तेच प्रेक्षकसुद्धा) असलेल्या दिवाळी स्वरमयी पहाटेच्या जाहिराती सुद्धा असा जाणीवेचा चिमटा काढतात.
      आम्ही लहान असताना (म्हणजे फराळ खाऊन आपण जाड होणार नाहीत ना याची काळजी नसायचं वय)ही जाणीव जास्त व्हायची. त्याला कारणही तसेच,दिवाळीपूर्वी सहामाही परीक्षेत आपण फोडलेल्या फटाक्यांचे आवाज येणार याची धास्ती वाटायची,काही फटाके आपल्याला हवे तसे वाजत तरी काही फटाक्यांचा आवाज  अंगावर एखादा वळ उमटवूनही जायचा. मला किल्ला करण्याची विशेष आवड.दगड-विटा रचून त्यावर चिखलाचा गिलावा करून आजूबाजूला काळी माती टाकायची,त्यात मोहरीच्या बिया टाकल्या कि जंगल तयार व्हायचं. मग महाराजांची,बाजी-तानाजीची मुर्ती त्यावर ठेवली कि जणू त्या शिवकाळाची प्राणप्रतिष्ठा आपल्याच देहात होतीय असा भास व्हायचा. मोठ्या प्रेमाने तयार केलेला तो किल्ला आवरून ठेवणे मला आवडले नाही.ते न करायला जसा माझा जात्याचा आळशीपणा कारणीभूत होता तसाच आपले भावविश्व् स्वतःच मोडून टाकण्याचा तिटकाराही  होता.काळाप्रमाणे मी या दोन्ही सवयी बदलल्या हा भाग अलहिदा.
          आता दिवाळी जाताना वाटणारी हुरहुर कमी आणि संप मिटला तरी गाड्यांना गर्दी असेल का? फराळ कमी तेलातील होता ना? Jio भाववाढ करेल का? अमेरीका युनेस्कोतुन बाहेर पडल्याचे काय परिणाम होतील? (झालंच तर या ८ नोव्हेंबरला पुन्हा.......) अशा स्वतःच्या कमी आणि जगाच्या अधिक (म्हणजेच पुणेरी) चिंता सतावत असतात.त्यात आलेले फोटोज डिलीट करण्याचा वेगळा त्रास. लोकांनी दिवाळीत फोटो काढण्याचे प्रमाण असेच ठेवले तर फटाक्यांपाठोपाठ सेल्फीवर देखील निर्बंध येतील यात शंका नाही.
      एकूणच काय तर आमची दिवाळी किल्ला करण्यापासून हातात असलेले वेगवेगळे Task kill करण्यापर्यंत पोहोचली हा वात न शिलगावताही हळूहळू फुटणारा फटाका अस्वस्थही करतो तशीच थोडी मजाही देतो.©

Wednesday, 6 September 2017

शोधाच्या दिशा.....

      ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा त्रिवार निषेध.हत्या कुणाचीही असो ती दमणकारीच,मग डाव्या कॉम्रेडची असो की उजव्या स्वयंसेवकाची,त्याचा निर्भत्सनाच केली पाहिजे आणि कायद्याने त्यांना योग्य ती शिक्षा व्हायला हवी यात दुमत नाही.
        इतर कुठल्याही हत्येनंतर काही प्राथमिक प्रश्न उपस्थित होतात. हत्या कुणी केली?कशी केली? त्यामागे नेमका हेतू काय होता? हे त्यातील काही.गौरी लंकेश यांच्या हत्येनंतरही हेच प्रश्न पुन्हा डोकं वर काढत आहेत.फक्त इतरवेळी या प्रश्नांची उत्तरं पोलिस-न्यायपालिका शोधते इथे सोशल मीडियावर बसलेल्या 'तज्ञ न्यायमूर्तींना' आणि 'साक्षीदारांना' ती आधीच माहिती असतात.दाभोलकर, पानसरे,कलबुर्गी यांप्रमाणेच गौरीजींची हत्या उजव्या विचारसरणीने केली हा तपासाविना काढलेला निष्कर्ष त्यातलाच प्रकार.तपासाला अशी दिशा देणारी(?) विधानं करणं जवाबदार माध्यमांनी आणि व्यक्तींनी थांबवणं हितावह राहील ते याच कारणामुळे असं मानायला जागा आहे.
        दुसरा भाग येतो तपासाचा. दाभोलकर,कलबुर्गी आता लंकेश या तिघांच्याही हत्या काँग्रेसचं सरकार असताना झाल्या.ज्यांना राज्यशास्त्र थोडंबहुत कळतं त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राज्याच्या अखत्यारीत येतं हे समजते.
          तिसरा आणि वरकरणी लहान वाटणारा पण Propaganda पसरवणारा मुद्दा. कुठल्यातरी टोकाच्या हिंदुत्ववाद्याने लंकेश यांच्याबद्दल अवमानकारक tweet केले.(मृत्यूनंतर एखाद्याविषयी अप्रिय बोलले जात नाही ही हिंदु संस्कृती त्याला कळलेली नसावी.)तर या व्यक्तीला PM follow करतात म्हणून आगडोंब उसळवला जातो. हे किती खरं-किती खोटं देव जाणे. परंतु ट्विटरवर follow केल्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या विचाराशी आपण सहमत असूच असे नाही,निदान मुक्त विचारांची वकिली करणाऱ्यांनी तरी हे भान बाळगले पाहिजे.
           Francis Parker Yockey हा अमेरिकन राजकीय तत्वज्ञ एकदा म्हटला होता,
"Rationalism, which is the feeling that everything is subject to and completely explicable by Reason, consequently rejects everything not visible and calculable."
        याचं आपल्याला विस्मरण झाले आहे का?
©

Saturday, 26 August 2017

सोनाराने टोचले कान.....

ताजमहाल हे शिवमंदीर 'तेजोमहालय' नाही हे Archeological survey of India नेच मान्य केले हे बरे झाले. त्यातही केंद्रात भाजपा असताना,मोदी पंतप्रधान असताना आणि सरकारचा इतर क्षेत्रात हस्तक्षेप होतो हे आरोप होत असताना ASI ने  हे मान्य केले हे द्विअर्थी उपयोगाचे.एक म्हणजे केंद्र अशा संस्थात फार ढवळाढवळ करत नाही असे यातून ध्वनीत होते. दुसरे म्हणजे सरकार कुणाचेही असले तरी इतिहासात नसलेल्या गोष्टींना सत्यात आणणे शक्य नसते याचा पुनरुवाच.

      खरंतर आपल्या पत्नीच्या, अर्जुमंद बानो बेगम च्या स्मरणार्थ शाहजहानाने ही वास्तू बांधली. शाहजहान जेव्हा शाहजदा खुर्रम होता,तेव्हाचे त्याचे आणि अर्जुमंदचे प्रेम.जहाँगीर बादशहा होता तेव्हा. त्यावर नुरजहाँ,खुर्रम आणि वजीर असिफखान यांचा विशेष प्रभाव.विशेषतः जहाँगीरच्या उत्तर काळात मुघलांचे सत्ताकारण यांच्या हातातले बाहुले. अशावेळी नुरजहाँच्या पहिल्या नवऱ्याची,शेर अफगाणची मुलगी लाडली बानो आणि खुर्रमचा विवाह व्हावा हा तिचा हेतू.

       प्रत्यक्षात मात्र खुर्रमची प्रेयसी अर्जुमंद असिफखानची मुलगी. पुढे त्यांचेच लग्न झाले,याचा राग म्हणून लाडली बानोचे लग्न नुरजहाँने शाहियारशी करून दिले.शाहियार हा कर्तृत्वशुन्य, विलासी शहजादा.त्याला बादशहा करून सत्तेची दोरी आपल्या हातात राहील ही नुरजहाँची अटकळ.पुढे राजकारणाने वेगळे वळण घेतले आणि खुर्रम बादशहा झाला,असिफखानने जावयाला प्रचंड मदत केली.(याविषयी सविस्तर लिहीन एकदा.)दरम्यान खुर्रमचा शाहजहान झाला होता आणि अर्जुमंदची मुमताज उल झमानी.

 बुऱ्हाणपूरच्या शाहजहानच्या स्वारीवेळी बाळंपणात मुमताज गेली. त्यानंतर तिच्यासाठी बांधलेला हा ताज-महाल.तैमुरच्या   वंशातील सर्व वैशिष्ट्य एकत्र करून बांधलेला.

        आता ASI नेच कान टोचले हे बरं झालं. UNESCO ने वारसा यादीत नोंदवलेलीही वास्तू आता तरी वादग्रस्ततेच्या कचाट्यातून सुटेल अशी आशा आहे.©


http://m.timesofindia.com/city/agra/for-the-first-time-asi-tells-court-taj-is-not-a-temple-but-a-tomb/articleshow/60224065.cms



Saturday, 25 March 2017

आमचे दुसरे पत्र.

प्रिय तात्यास,
              आज अनेक दिवसांनी पत्र लिहायला घेतले.त्यास कारणही तसेच हो,आपल्याकडे हल्ली digital आप्तेष्ट फक्त सणासुदीला आठवावे असा नवीन प्रघात पडत चालला आहे.तुला माहितीच आहे की मला काळाच्या मागे राहावयास आवडत नाही म्हणून बदलणाऱ्या काळातल्या चुकीच्या परंपरादेखील मी पाळतो.असो.तसाही मला इतके दिवस पत्र लिहायला वेळ नव्हता.त्याची अनेक कारणे आहेत बाबा.
      एकतर आमच्या देशात पंतप्रधानांनी नोटबंदी करून पाहिली.पाचशे-हजारच्या नोटाच एका रात्री बंद.माझ्या खिशातला सगळा खुर्दा खुळखुळला तरी ७१२ रुपये आणि आठ आणे मिळाले.यात पाचशेची एकही नोट नाही,म्हणून मी मजा बघायला बँकेच्या रांगेत जाऊन उभा राहायचो,उरल्या वेळात फेसबुकवर पोस्टी चिकटवायचो.या सगळ्या प्रकारात मला तर आपण अर्थशास्त्राची डॉक्टरेट घ्यावी असे वाटू लागले..पण शेवटी मी तो नाद सोडून दिला.
          मागे आठवड्या-दोन आठवड्यापूर्वी सुद्धा मला अचानक राजकीय विश्लेषक व्हायची लहर आली होती.आता तो कुणी योगी मुख्यमंत्री केलाय बाबा त्या भैय्यांनी.मी काल मुलाला तेच म्हणालो,"मी संन्यास घेऊन बाबा झालो असतो तर माझ्या ब्रह्मचर्याच्या तेजाने तुला मिरजेला डॉक्टर व्हायला धाडले असते." पण ते सुद्धा फार संप करतात हल्ली.पेपर उघडला कि जाहिरातींपेक्षा संपाच्या बातम्याच जास्त.पुर्वी पेपर मध्ये किती जाहिराती यायच्या अरे म्हणून सांगू,पण 'टाइम्स'हॅव चेंजड.म्हणून मी पेपर वाचनेच बंद केले.
           तुझे काय सुरु असते हल्ली?ट्रम्प काशीयात्रेला सबसिडी देणार आहे म्हणे.एखादी आमच्या विश्वेश्वराला दे म्हणावं.तेवढीच पुढची टर्म मिळेल...काय म्हणता?
बाकी यावेळी आंबे फक्कड येतील असे दिसते.तुस फोटो पाठवेनच.नात्यांचा गोडवा फोटोच्या माध्यमातून टिकतो हे काय कमी थोडीच आहे..!
                                                  तुझाच,
                                                स.दा.भोळे
                 (ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि राजकीय विश्लेषक तसेच प्रगतिशील शेतकरी)

   

Tuesday, 21 March 2017

कवितेचा जन्म

उगीचच कागदावर
माराव्यात चार रेघोट्या,
शाईत डबडबलेलं पेन
शिंपडावं पांढऱ्या-कोऱ्या कॅनव्हासवर.
त्या ओघळलेल्या शाईच्या थेंबातून,
जन्माला यायला लागतात कविता.
हातात हात धरून,
फेर मांडून नाचू लागतात.
उगाचच.
गोल गिरक्या घेत कधी,
आकाशाला चुंबू पाहतात.
जमिनीवर कोसळून,
धाय मोकलून
कधी कधी रडू कोसळतात.
पडलेल्या त्या अक्षरातूनच पेटू उठतो विखार कधी,
मग माणसांचे संगर जिवंत होतात
आणि अन्यायाला वाचा फुटते.
पेटतात वणवे ओल्या सच्छिद्र लाकडातून
आणि शांतरस पिऊन विझतात आलिप्तपणे.

मग कॅनव्हासवर शिंपडलेल्या ओघळातून,
साकारत जातं एक-एक चित्र
मुर्त-अमूर्त भावनांचे.
अंतरीच्या वेदनांच्या थारोळ्यात
अंकुरलेल्या या जीवलाच,
तुम्ही-आम्ही कविता म्हणतो.©

(जागतिक कविता दिनानिमित्त......)