प्रिय आमिर
तुला काही लिहाव (आणि बोलाव) अस काहीच आता उरल नाही.गेल्या दोन दिवसात तुझ्या अतिअसहिष्णु टिप्पणी वरचा असहिष्णु हंगामा अखेर आज संपला(लोक अचानक आज patriotic moodमध्ये shift झालेत) कुठेही trolls नाहीत,बातम्या नाहीत,forwarded जोक्स नाहीत सगळ कस शांत शांत (पक्षी:सहिष्णु सहिष्णु)....
खरतर चुक तुझी नाहीच मुळी,असलीच तर आमची आहे...चित्रपटात तु उभा करत असलेला नायक, मंगल पांडे पासून डीजे पर्यंत आणि ACP राठोड पासून ते भुवन पर्यंतचा 'तु' आम्ही खरा मानत आलो.पडद्यावर दिसणारा नायक हा त्याच्या आयुष्यातही तितकाच sensible असतो हा भेद आम्ही विसरतो आणि स्वत:ला त्रास करून घेतला.सलमानच्या शिक्षेवेळी पण आम्ही हेच केल होत आठवतय ना?
CSR activity म्हणून तुम्ही केलेली समाजसेवा ही तुमची आणखी एक प्रतिमा,तीच वास्तव फक्त प्रसिद्धी पुरतच असत हेही आम्ही विसरतो ही आमची दूसरी चुक.
आता 'ते' वाक्य तु बोललाच नव्हतास,किरण राव बोलली होती (त्यात ती हिंदू)म्हणून तुला तांत्रिक अटींवर निर्दोष ठरवण्याचा डावखुरा बावळटपणा मी करणार नाही तसच तुझ्या चित्रपटावर बहिष्कार घाला वैगेरे उपद्यापही मला पटत नाहीत (एक कलाकार म्हणून तुझ कौशल्य वादातीत आहे ,मग मी एक चांगला चित्रपट का सोडू? )
तु काय,शाहरुख काय,कमाल खान काय किंवा विजय तेंडुलकर,यु.आर.अनंतमुर्ति काय कलाकाराने 'फ्रेम' सोडली की उरणाऱ्या व्यक्तीला किती गंभीरपणे घ्यायच हे आम्हाला आता ठरवाव लागेल..
तुझाच
एक सहिष्णु भारतीय चाहता
Thursday, 26 November 2015
प्रिय आमिर
Wednesday, 25 November 2015
प्रीतीसंगमावर.....
प्रीतीसंगमाच्या तटावर
मावळतीला जाणार्या सुर्यनारायणाला
विचारल मी देताना अर्घ्य,
"सत्तेच्या सारीपाटात
कवीमनाच्या सोंगटयांना
असते का काही किंमत?
एकनिष्ठा आणि पावित्र्याच्या
शुभ्रवस्त्रांना
का असतो अवहेलनेचा शाप
सदासर्वकाळ,
राजनीतीच्या क्रूर चौसरात,
नीतीची बोट धरून जाताना
काय उरत मागे शेवटी?
नावामागच्या संन्यस्त ओझ्याशिवाय....."
तेजाळलेल्या सात घोडयाचे लगाम खेचत
किंचीत स्मिताने
रविराज उदगारला...
"उरते ती काळावर उमटवलेली
कर्तृत्वाची तप्तमुद्रा
आणि सहस्त्रक उजळणार
उपभोगशून्य स्वामित्व"
Saturday, 21 November 2015
देशप्रेमी
देशप्रेमी
सीमेवर शहीद झालेल्या कर्नलसाठी
हळवा झाला तोही इतरांसारखाच,
'वीर जवान तुझे सलाम'
म्हणत छातीचे पटबंध तुटले
डोळ्यात न आलेले अश्रु रुमालाने पुसत
आपल देशप्रेम मांडायला सुरुवात केली त्याने बाजारात
What's app वर बदलल status
'शहीदाला नमन'
अमर जवानवाला DP
नंतर
एक फेसबुकवरची पोस्ट
त्यावरचे 21 Likes आणि 3 comments
("श्शी,फक्त इतकेच
काय राव आपले लोक कुणाला देशाची किंमतच नाय")
त्यामुळे असहय झालेली विषण्णता
.
.
.
.
.
आज सकाळी नेहेमीप्रमाणे
तो उशीरा उठला
एव्हाना त्याची उतरलेली असते....
(मग ती देशभक्ती का असेना)
उधारीच्या पैशाने
नाक्यावरची कटींग,
अन क्रिमरोल खात
हातातल्या पोवळ्याशी चाळा करत
लोकांना देशप्रेमाचे धड़े देत होता
Saturday, 14 November 2015
जवाहर
प्रिय जवाहर,
तुला आता आठवतही नसेल कदाचित,
स्वातंत्र्याच्या लढ्यात तुझा तो आवेश,
पुर्ण स्वातंत्र्याचा आग्रह,
मला तुझ्याकडे खेचून आणायचा.
स्वातंत्र्याच्या दिवशी एखाद्या राजपुत्रासारखा
खादीच्या शुभ्रवस्त्रांनी नटलेला तु,
हातात मंगलकलश घेऊन चालत होतास नेटाने
आम्हां सर्वांच्या पुढे....
'आपल्या आयुष्यातुन प्रकाश' निघून गेल्यावर,
किती धीरोदात्तपणे सावरलं होतंस तु आम्हांला.
हातात हात धरून नियतिशी किती करार केले होते ना आपण...!
आमच्या स्वप्नांचा सुकाणु तुझ्या हाती देऊन,
निर्धास्तपणे धावत होतो आम्ही तुझ्या मागे.
उन्हा-पावसाची,
थंडी-वाऱ्याची,
तहान-भुकेची ,
तमा न बाळगता...
शांतीवनातल्या गर्द राईमध्ये,
तु पहुडला असशील आज चिरनिद्रेत,
पण मी बघतोय,
तुझ्या विखुरलेल्या राखेतुन
नवा भारत जिवंत होताना..
-निखील©
दोन वर्षांपूर्वी नेहरूंना श्रद्धांजली म्हणून लिहिलेली ही कविता. मागे एकदा एका मित्राला ऐकवली होती.तेव्हा तो म्हणाला होता,"तु Nehruvian आहेस का?"
मी उत्तरलो होतो त्याला,"आधुनिक भारताचं स्वप्न बनणारा प्रत्येक जण Basically Nehruvianच असतो.....!"
Thursday, 12 November 2015
भीष्मास
भीष्मा
स्मरतय तुला,
तुझ्या भीष्मप्रतिज्ञांनी डळमळणारी इंद्रासने,
दिग्विजयासाठी काढलेल्या तुझ्या 'रथयात्रांनी'
कंपित होणारी शत्रुंचे चेहरे,
सत्तेला लाथ मारणाऱ्या तुझ्या निश्चयानंतर 'भीष्मोय' म्हणून गरजणारे ब्रम्हांड..
न्यायआश्वासक असणारा तुझा तो निपक्षपाती (नी धोरणी) आवाज,
आणि सत्य,त्याग आणि संन्यसत्वाचे प्रतिक असणारे तुझे ते शुभ्र राजवस्त्र....
भीष्मा,
याच राजवस्त्राची लक्तर होतात तेव्हा,
जेव्हा द्रौपदी वस्रहरणावेळी तु मौन पाळतोस
हतबल मौन,
दुर्योधनाच्या अपौरुषेय सेनेचा तु होतोस सेनापती,
अन त्याच्या अधर्मी भात्यातुन सोडतोस बाण तुझ्याच लाडक्या पांडवांवर...!
अशावेळी हाती काही येत नाही रे,भीष्मा
उरत केवळ
नावामागच्या श्रद्धेयत्वाचे निस्तेज होत जाणारे अवशेष,
आणि प्रतिज्ञा,धर्म ,न्याय आणि सत्तेच्या द्वंद्वातून जन्मणारी (काळाची ) कठोर शरशय्या...!