Thursday, 7 May 2020

टागोर

रवीन्द्रांचे माझ्या संग्रहातील हाताला लागेल ते पुस्तक घेऊन मी फुरसदीच्या क्षणी वाचत असतो. ते क्षण सत्कारणी लागले नाहीत असे मला केव्हाही वाटत नाही. त्यांच्या साहित्यामुळे शांतिनिकेतनपासून असलेले दूरत्व भासत नाही की तिथे जाण्याची ओढ अधिक लागते हे मला सांगता येत नाही. शांतिनिकेतनात गेलो त्यावेळी गुरुदेवांच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे 'जीबोने आज कि प्रथम एलो बशन्तो?  (जीवनातच आज प्रथमच वसन्त आला का ?) असा प्रश्न मल पडला होता. पुढे साऱ्या ऋतंतले सौन्दर्य पाहाण्याची त्यांनीच दृष्टी दिली. वसंताचे स्वागत करणारे रवीन्द्र ग्रीष्माला देखील 'अग्निस्नाने शुचि होक धरा-' अग्निस्नानाने पृथ्वी शुचिर्भूत होवो म्हणताना दिसले. आज एखाद्या पहाटे मराठी नाटकातले एखादे जुने पद माझ्याबरोबरच माझ्या मनात जागे होते, तितक्याच सहजतेने बंगाली बाऊलांच्या गीतांतले गीतही माझ्या बरोबर उठते. आकाशातले ढग नकळत 'बादोल बाऊल बाजाय रे एकतारी-' (मेघ बाऊल एकतारी वाजवतोय) ही ओळ सुचवून जातात. पावसाळ्यात पानांवरून पाण्याचे थेंब टपटप गळू लागले की ते रवीन्द्रांच्या कवितेतल्या _'पाताय पाताय टुपुर टुपुर नुपूर मधुर बाजे'_ चे स्मरण करून देतात. एका फार मोठ्या भांडाराच्या किल्ल्या मला गवसल्या ह्याचे मला समाधान आहे.
                                           -पु.ल.देशपांडे
                         ('वंगचित्रे'च्या प्रस्तावनेमधून साभार)