Monday, 25 April 2016

कन्हैय्याने केलेले वस्त्रहरण....!

भारतात हल्ली प्रसिद्धीपरायण लोकांची मोठी चलती आहे.एक-दोन सभा घायच्या,चार-पाच मुलाखती द्यायच्या रात्री दूरचित्रवाणीवरील चर्चेत (निवेदकालाही लाजवेल)इतक्या वरच्या आवाजात स्वत:च मत पटवून द्यायचं,असे काही सहज सोपस्कार पार पाडलेल्या व्यक्तींना माध्यमवीर डोक्यावर घेतात आणि ‘नेता’ म्हणून मिरवतात.काही दिवसांनी माध्यमांचा ओघ दुसरीकडे वळाला तर मुळातच उथळ असलेलं हे नेतृत्व उघडे पडते.गुजरातमधला हार्दिक पटेल काय किंवा जेएनयुचा कन्हैय्या काय,दोघेही याच परंपरेचे अपत्य.आजवरच्या सार्वजनिक जीवनात फार काही कर्तृत्व दाखवलेले नसताना सरकारवर टीका करणे सोपे असते,त्याने झटपट प्रसिद्धी देखील साधते.तसं पाहिलं तर अशा लोकांना ‘बालिश बहु बडबडला’ म्हणून सोडून देणे इष्ट असते.पण उजव्या गटातील मंडळींना त्याला विरोध केल्याशिवाय चैन पडत नाही आणि त्याचमुळे त्यांचे वृत्तमुल्य वाढत जाते.
       कन्हैय्याकुमार पुण्यात आला आणि त्याने आपल्या जुन्याच भाषणातील मुद्द्यांचा राग पुन्हा आळवला.मग भांडवलशाहीवर टीका असो,संघ-भाजपच्या नावाने केलेला तळतळाट असो,आणि मग थोडासा भावनिक ओलावा हवा म्हणून दुष्काळ आणि चवीपुरते जातीनिर्मूलनाचे भाष्य केले कि कन्हैय्याचे भाषण तयार होते.जोडीला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन मार्क्सवादाची वैचारिक चौकट मांडून लोकांच्या बुद्धेभेदाचा प्रयत्न यापलीकडे भाषणात काहीच सापडत नाही.सोव्हिएत युनियनच्या मोडकळीस आल्यानंतर जगातील बहुतांश देशांनी डाव्यामार्गाचा त्याग केला.१९९१ला भारताने देखील आपली आर्थिक कूस बदलून स्वत:ला उजवीकडे सरकवले.त्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थकारणावर झाला.‘परमीट राज’ संपला,मुक्त व्यापाराला चालना मिळाली,देशाच्या सेवा क्षेत्रातील वाढ वृद्धिंगत होऊन नव्या नोकऱ्यांची दालने युवकांना उघडी झाली.अशावेळी चावून चोथा झालेला कन्हैय्याचा भांडवलशाही विरोध बौद्धिक पातळीवर फारसा प्रभावी ठरत नाही आणि व्यावहारिक पातळीवरदेखील तो अव्यवहारी वाटतो.
       कन्हैय्या कुमार ज्या विचारसरणीचा स्वत:ला वारसदार मानतो त्या कम्युनिस्टांच्या २५ वर्षांच्या राजवटीत पश्चिम बंगाल मधून जातीयवाद संपला का?या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक असेल(आणि दुर्दैवाने ते आहेच!) तर डाव्या चळवळीकडून केले जाणारे जातीनिर्मूलनाचे भाष्य हे केवळ शाब्दिक बुडबुडे ठरतात.दुसरीकडे संघावर तोंडसुख घेताना संघाच्या विरोधात आपण कोणता कार्यक्रम हातात घेऊ यासाठी त्याच्याकडे शब्द नाहीत.जिथे संघ प्रभावी आहे तिथल्या समाजरचनेला शह देऊ शकेल अशी पर्यायी रचना निर्माण करणे हे कन्हैय्यासमोरचे खरे आव्हान असेल.पण त्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम लक्षात घेता एखाद्या बाईटवर बरेच काही साधते.त्यामुळे त्याच्या पुण्यातील भाषणासाठी आकांडतांडव आणि वितंडवाद यापेक्षा वेगळे समानार्थी शब्द सापडत नाहीत.

         नरेंद्र मोदींना प्रभावी विरोधक नाही.त्यामुळे विरोधक इतके हताश झाले आहेत कि विरोध करण्यासाठी कुठल्याही पाषाणाला शेंदूर माखून देव करण्याची त्यांची तयारी आहे.देशद्रोहाच्या आरोपात जामिनावर सुटलेल्या एका आरोपीसाठी पुण्यनगरीच्या प्रथम नागरीकापासून विवीध सामाजिक-राजकीय नेते गर्दी करतात हे याच निराश मनस्थितीचे द्योतक आहे.महाभारतात कृष्णाने द्रौपदी वस्त्रहरणावेळी तिला वस्त्र पुरवून तिचे लज्जारक्षण केल्याचा प्रसंग आहे.परंतु इथे कन्हैय्या साक्षात स्वत:च्या चळवळीचेच वस्त्रहरण करतोय.या उत्तरेतल्या कन्हैय्याने श्रीपाद अमृत डांगेंच्या महाराष्ट्रात येऊन इथल्या डाव्यांना आता नेतृत्व नाही तर ते आयात करावे लागते आहे हे दाखवून दिले,एकार्थाने ते राजकीय वस्त्रहरणचं नाही काय?


(छायाचित्र:इंटरनेटवरून साभार)

Saturday, 23 April 2016

शेक्सपिअर

विल्यम,
षड्रिपूंच्या जहरी प्यालात,
आदिम दुःखाची शाई ओतून
लिहून काढलेस तू मूर्तिमंत कारुण्य,
ज्याच्या पुढे आम्हांला आमचीच दुःख छोटी वाटतात.
प्रेम,कारुण्य,भय,संशय आणि मत्सराने गुरफटलेले तुझे पात्र,
जिवंतपणी भेटतात गल्लोगल्ली.
संभ्रमानी चित्कारणारे हॅम्लेट,
तोच सवाल पुसतात...जगावं कि मरावं?
हाडामांसाची वळकटी करून
सोडलेले निराधार लियर.
आणि विश्वासघाताच्या खंजिराने विव्हळणारे
सीझरसुद्धा
रस्त्यावर सापडतात सहज......
आज चारशे वर्षांनी
जगाच्या स्टेजवर
अलिप्ततेच्या अवनिकेतून,
जेव्हा पहात असशील तू,
हे ‘तीन अंकी’ नाटक
तेव्हा दिसतील तुला,
तुझा प्रत्येक शब्द
अस्तित्वात येणारा..
कारण माणूस मर्त्य असतो

आणि शेक्सपिअर अमर.

(छायाचित्र:गूगल डूडलवरून साभार)