विल्यम,
षड्रिपूंच्या जहरी प्यालात,
आदिम दुःखाची शाई ओतून
लिहून काढलेस तू मूर्तिमंत कारुण्य,
ज्याच्या पुढे आम्हांला आमचीच दुःख छोटी वाटतात.
प्रेम,कारुण्य,भय,संशय आणि मत्सराने गुरफटलेले तुझे पात्र,
जिवंतपणी भेटतात गल्लोगल्ली.
संभ्रमानी चित्कारणारे हॅम्लेट,
तोच सवाल पुसतात...जगावं कि मरावं?
हाडामांसाची वळकटी करून
सोडलेले निराधार लियर.
आणि विश्वासघाताच्या खंजिराने विव्हळणारे
सीझरसुद्धा
रस्त्यावर सापडतात सहज......
आज चारशे वर्षांनी
जगाच्या स्टेजवर
अलिप्ततेच्या अवनिकेतून,
जेव्हा पहात असशील तू,
हे ‘तीन अंकी’ नाटक
तेव्हा दिसतील तुला,
तुझा प्रत्येक शब्द
अस्तित्वात येणारा..
कारण माणूस मर्त्य असतो
आणि शेक्सपिअर अमर.
(छायाचित्र:गूगल डूडलवरून साभार)

waah badhiya hai cool karni
ReplyDelete