‘उश्ता अह्माइ यह्माइ उश्ता कह्याइचीत्’
ज्याच्यामुळे सर्वांस प्रकाश मिळतो,त्यास प्रकाश प्राप्त होतो.(यस्न ४३·१)
वारसा नशिबाने मिळतो,आई-बापाची कर्म स्थानं मुलानातवांच्या कुंडलीत लाभस्थानी प्रकटतात,त्यांनी कष्ट करताना गाळलेल्या घर्मबिंदुमुळे पुढच्या पिढयांना मोत्याचे घास खायला मिळतात.भारतात वारसदार राजकारण्यांचा आणि कलाकारांचाच बघायची प्रथा आहे.त्यामुळे गांधी आणि कपुर आदी पिढ्यांचे सध्याचे वारस स्वतःला सिद्ध करण्यात कितीही कमी पडत असतील तरीही त्यांची तळी उचलणाऱ्यांची संख्या कमी नाही.क्रिकेटसारख्या खेळात लाला अमरनाथच्या पोटी आलेल्या मोहिंदर अमरनाथ वगळता कुणी फारशा धावा धावफलकावर लावल्या नाहीत.(योगराज सिंग हे काही यशस्वी क्रिकेटपटू नव्हेत.) त्यामुळे वारसा चालवताना लायक असलेल्या बिर्ला,बजाज,महिंद्रा,वाडिया,टाटा,अंबानी सारख्या घराण्याकडे चटकन आपल्या समाजवादाच्या प्रभावाने संकुचित झालेल्या नजरा जात नाहीत.
यातल्या इतर उद्योजक घराण्याकडे भाऊबंदकीदेखील आहे टाटा त्याला अपवाद.'बापसे बेटा सवाई ..'म्हणून नुसेरवान-जमशेटजींपासून सुरु झालेली परंपरा टाटा समूहाच्या ‘हुमत’ (सद्विचार), ‘हूख्त’ (सदुक्ती) व ‘ह्वर्श्त’ (सत्कृती) या त्रिसूत्रीला जागत रतन टाटांपर्यंत यशस्वीपणे पेलली गेली.भारतीय उद्योगांचे खच्चीकरण करण्याच्या ब्रिटिश कालखंडापासून ते ‘आपल्याच’ उद्योगांचे पंख छाटण्याच्या काळापर्यंत संघर्ष केलेल्या टाटांनी रोवलेल्या पोलादी मुळांचा वृक्ष उदारीकरणानंतर अजूनच फोफावला याचं जितकं श्रेय जेआरडींना तितकंच रतन टाटांना देखील.स्वत:च्या सोईसाठी सरकारी धोरणे बदलायला न लावणारा,पार्टीजला न जाता एकांतात विकेंड घालवणारा,स्वतःच्या आजारी श्वानांची काळजी घेण्यासाठी ब्रिटिश राजपरिवाराचा शाही सोहळा नाकारणारा, अपमानास्पद वागणूक देणाऱ्या ‘फोर्ड’ला धडा शिकवणारा, मध्यमवर्गीय भारतीयांच्या कारचं स्वप्न पूर्ण करणारा,किफायतशीर किंमतीत मोबाईल कॉल सुरू करणारा,जेआरडींच्या एअर इंडियाला परत मिळवणारा आणि दानधर्म करताना हात आखडता न घेणारा हा माणुस भारतीय असणं हे जितकं अभिमानाचं आहे तितकंच त्याच्या काळात जगणं गौरवाचं होतं! पारशी धर्मग्रंथ अवेस्तामध्ये सत्कर्म केल्याने आपण या जगात अमर होतो आणि आत्मिक जगात वैभवशाली उत्तम स्वर्ग प्राप्त करतो (यस्ना 43.1)असं वचन आहे. पृथ्वीवरचा पसारा आवरून इहलोकी प्रस्थान केलेल्या रतन टाटांना अशाच जागी स्थान मिळेल कदाचित....!
रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
No comments:
Post a Comment