सुशांतसिंग मृत्यू प्रकरणाची अवस्था पुलंच्या 'म्हैस'सारखी झाली आहे, "ती हत्या आहे की आत्महत्या हे कधीच निष्पन्न होणार नाही." असं सांगणारे देशातील अनेक तपासांचा अनुभव असलेले 'बगुनाना' तुमच्या आसपास असतात,मृतदेहाच्या केवळ फोटोवरून "ती आत्महत्या नसून तो खून कसा आहे,o mark-v mark याने फरक किती पडतो." हे समजून सांगणारे अनेक forensic experts ही 'होमेपदी' डॉक्टर सारखे चॅनेलवर आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करत आहेत."सुशांतला न्याय मिळायला हवा पण म्हणून मीडिया ट्रायल गरजेची नाही."असा उपदेश देणारे आणि सुबक ठेंगण्या प्रसिद्धीकडे बघत समेवर येताना "Law should take its own course." म्हणणारे मधु मलुष्टेही सहज सापडतील.संजय राऊतदेखील उस्मानशेटसारखे चार-दोन टाळकी हाताशी धरून काहीतरी पाडापाडी करतात.(उखाड दिया वैगेरे..) मग राऊंतांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून मराठी कलाकार सिनेमांसाठी अनुदानाची जांभळे मिळवू बघतात.
अर्णब गोस्वामी मात्र धर्मा मांडवकर असल्या सारखा भांडतोय, सुशांतच्या PM report वर आत्महत्या शेरा मारणाऱ्या कुपरच्या 'शिवराम गोविंदला' त्याने अडवून धरलंय.त्याच्या जोडीला अनेकांनी गावकऱ्यांसारखी आपली संयुक्त फळी उभारली आहे,त्यात कंगनाही आहे 'सुपडू सुतारा'सारखी एकमेकांशी संबंध नसलेल्या गोष्टींवर ती 'साक्ष' देतीय.
पोलीस वरिष्ठांच्या आज्ञेत राहून ऑर्डरली सारखं 'आमाला पावर नाय.'म्हणण्यात धन्यता मानत असताना CBI पोलीस साहेबासारखी धावून आली खरी पण 'खादी' घातलेल्या बाबासाहेब मोरेंना नक्की कुठल्या निष्कर्षात रस आहे याची खात्री न झाल्याने ते आस्ते कदम चालले आहेत.शेवटी आरुषी तलवार,सुनंदा पुष्कर प्रकरणाप्रमाणेच मिडिया,राजकारणी आणि तपास यंत्रणा अशा आडोशाच्या तिन्ही खाटा उधळून सुशांतच्या आत्महत्येची ( वा हत्येची ) ही म्हैस स्वत:च्या पायांनी चालती झालेली असेल.
No comments:
Post a Comment