"चांगुलपणा एवढं वाईट काही नाही जगात..."
इतकं टोकाचं नकारात्मक कोण बोललं म्हणून मी मागे बघितलं,तो उभा होता.पन्नास-पंचावन्न वय असावं,उंची तशी बेताचीच,जाड काड्याचा भिंगाचा चष्मा,पायघोळ पायजमा, अंगात सैलसर पांढरा शर्ट,डाव्या हातात एक कापडी पिशवी,उजव्या हातात चहाचा ग्लास धरत आपल्या मित्राला तो हे सांगत होता.आजच्या युगात एवढा ८०च्या दशकातला पोशाख केलेला आणि इतका नकारात्मक बोलणाऱ्या गृहस्थाच मला पहिल्यांदा हसू आलं....चहा संपवून मी आणि माझे मित्र विनोदात बुडालो,'त्याच' तत्वज्ञान सुरूच होतं,
"म्हणून सांगतो तुला,इतके उपकार करू नयेत कुणावर रे..."
त्याने आपल्या अनुभवाची शिदोरी पुन्हा एकदा सार्वजनिकपणे खुली केली,हातातला चहाचा ग्लास टेबलवर आदळून सुट्टे दहा रुपये त्याने काऊंटवर दिले आणि पायातली करकरती पुणेरी वहाण वाजवत तो चालायला लागला.तो दृष्टीआड होईपर्यंत मी त्याची ठेंगणी मूर्ती बघत होतो.
उन्हे कलायला लागली की ओंकारेश्वराच्या पुलावर आमचा मित्रमेळा जमत असे.(म्हणजे अजूनही जमतो)मग हास्यविनोदापासून राजकारणापर्यंत आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वापासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंत अनेक भौतिक-आधिभौतिक विषय चघळत बसायची आमची पुणेरी सवय.रोजच्या शेंगदाणेवाल्याकडून खाऱ्या दाण्याची पुरचुंडी घ्यायची आणि ती संपेपर्यंत गप्पा झोडत बसायच्या.
"तो पक्षी गरुड आहे की घार आहे?" एक पृच्छा.
"घार आहे रे ती,गरुड एवढा लहान नसतो.."निरसन
"अरे पण ती छोटी घार असू शकेल ना?" थोडीशी तिरकस शंका...
अशी काहीशी बोलणी चालू होती,हातातले शेंगदाण्याच्या पुडीशी चाळा करत मी शांतपणे ऐकत होतो.
तेवढ्यात 'सफर'चं 'जो तुम को हो पसंद वही बात करेंगे...' ऐकू आलं.
मी 'लाजवाब' म्हणून शेजारी बघितलं तर 'तो' फुटपाथवर बसलेला.
लेस लावलेला एक जुना मोबाईल खिशात ठेऊन तो गाणी ऐकत होता.
आजूबाजूच्या जगाचं त्याला फारसं देणं-घेणं नव्हतं...आपण ऐकत असलेल्या गाण्यामुळे कुणाला त्रास होतोय याची ना तमा होती ना कुणाला आनंद होतोय याची जाणीव.अजून चार-पाच गाणी ऐकून त्याने घड्याळाकडे बघितलं.आणि गाणी बंद करून आपली कापडी पिशवी उचलली.खिशातून विडी काढून ती पेटवली.ती ओढण्याची देखील त्याची एक लकब होती,तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्ये विडी धरून ती तो ओढत असे.त्याच्या चालण्याच्या त्या कर्रssकर्र आवाजाबरोबर तो अदृश्यही झाला.
त्यानंतर अनेकदा तो त्या पुलावर दिसायचा,त्याच वेळेला गाणी ऐकत.आठ वाजले की निघून जायचा.त्याचं गाण्यांचा संग्रह मात्र सुंदर होतं.कुमारपासून किशोरपर्यंत अनेक गाणी तो ऐकत असे,ऐकवत असे.स्वरांच्या जलौघात न्हाऊनही हा मनुष्य इतका कोरडा कसा शकतो याचं कोडं मला राहून राहून वाटे.
"तुमचं गाण्याचं collection छान असतं."
शिष्टाचाराची पारंपरिक पद्धत न पाळता मी त्याला compliment दिली.
आपली समाधी भंग करणारा हा कोण ? या प्रश्नार्थक भावाने त्याने माझ्याकडे त्रासिकपणे पाहिलं.
मला याची अपेक्षा होतीच म्हणून मी माझ्या ठेवणीतलं दुसरं हत्यार काढलं..
"कुठून जमवलीत एवढी गाणी?"
"हम्म्म..."
तो काहीसा गोंधळला,त्याच्या डोळ्यांची चमत्कारिक उघडझाप झाली.
"चहा घेणार?"
माझ्या या प्रश्नावर त्याने अनिच्छेने मंद स्मित केलं आणि नको म्हणाला.
घड्याळाकडे बोट दाखवत,
"आता जायची वेळ झाली.."
असं पुटपुटला आणि चालायला लागला.
त्यानंतर तो अनेकदा दिसत असे,
कधी कधी नमस्कार-चमत्काराचे सोपस्कारही पार पडत.
पण शिष्टाचाराच्या परीटघडीला मोडून त्याने कधी आमच्याशी संवाद साधला नाही आणि त्याच्या जिवंत समाधीतून आम्ही त्याला कधी बाहेर काढलं नाही.
नंतर बराच काळ परीक्षांमुळे मी त्या पुलावर गेलो नाही.
हल्ली त्याच्याबरोबर त्याच्या तो चहा पिणारा मित्र येत असे.
हा त्याच्यापेक्षा फारच वेगळा.साडेपाच फुटाच्या आत बाहेरची
उंची,पोट सुटलेलं,दाढीचे खुंट वाढलेले आणि आपल्या वयाला न शोभणारा
टीशर्ट घातलेला,हातात एक रंगीबेरंगी रुमाल.तो मात्र आमच्या बरोबर बोलायचा....
त्याचा मित्र अगदीच भिन्न प्रवृत्तीचा,त्याच्या आयुष्याला वळणं वैगेरे असं काही नव्हतचं.कायम टीशर्ट घालणाऱ्या माणसाच्या आयुष्याला परीटघडी कसली म्हणा?निर्मात्याने दोन वेगळ्या साच्यातून काढलेले हे दोघे एकत्र कसे राहतात याचं मला नवल वाटे.
काही काळाने त्याच्याशी ओळख वाढली,
एकदा सहज चहाच्या टपरीवर मी त्याला विचारलं
"का ओ? तुमचे ते मित्र असे तंद्रीत का असतात कायम?"
"कोण तो ना?" त्याने विचारलं
"हो?"
"तसा नव्हता तो पूर्वी,४० वर्ष ओळखतो मी त्याला.
पूर्वी तो हि नीट होता,लहानपणीच वडील गेले.गरीबीत वाढून मॅट्रिक झाला आणि नोकरी लागली.
लग्न झालं.सगळं सुखाने सुरु होतं.पण सुख 'खो' घालतं म्हणतात ना ते असं बघा.
"म्हणजे?"
"त्याचा मुलगा गेला,चार-पाच वर्षांचा असेल...
विषमज्वर झाला त्याला,नीट उपचार मिळाले नाहीत.त्यात तो गेला. तो गेला आणि इकडे आमच्या वहिनींना वेड लागलं पुत्रशोकाने,त्या वेड्यांच्या इस्पितळात."
"अरेरे..." मला हळहळून आलं.
"आई आणि हा दोघेच,मग आई गेली काही वर्षांनी.थकलीच होती म्हातारी.
ती गेल्यावर याने असलेली नोकरी सोडली आणि सरावाच्या दारिद्र्याबरोबर पुन्हा संसार सुरु झाला."
डोळ्यात दाटलेलं पाणी नकळतपणे आपल्या रंगीबेरंगी रुमालाला पुसत त्याचा मित्र मला सांगत होता...
मी सुन्नपणे सगळं ऐकत होतो,
जराशा टोचणीने डोळ्यातून पाणी येणारे आम्ही खरे की आयुष्याने जीवनरस शोषून घेतल्यावर डोळ्यांतुन टिपूस न गाळणारा तो खरा?
भितींचे पोपडे उडाले म्हणून आकांत मांडणारे आम्ही अस्सल कि स्वप्नांचे इमले जमीनदोस्त झाल्यावरही त्याच्याकडे निरसपणे बघून बिडी शिलगावणारा हा?
हे मला अजूनही समजलेलं नाही.
आज रुक्ष आणि कोरडा वाटणारा प्रत्येक प्रवाह कधीकाळी तुडुंब भरलेला असतो...
त्यानंतर मला ते दोघे कधीच पुलावर भेटले नाहीत,पण अजूनही संध्याकाळी पुणेरी वहाणेचा कर्रssकर्रर्रर्र आवाज ऐकू आला की माझे कान टवकारले जातात.
समाप्त.
सर्व हक्क लेखकाधीन©
No comments:
Post a Comment