दिवाळी येण्याची जितकी आतुरतेने वाट बघावी त्यापेक्षा घाईने ती निघून जाते याची हुरहूर जास्त जाणवत राहणारी असते. साधारणपणे दसऱ्यानंतर दुकाने सजू लागतात,फटाक्यांचे आवाज यायला लागतात,फराळाचा सुवास हवेत तरळायला लागतो आणि दिवाळी आल्याची जाणीव व्हायला लागते.हल्ली या यादीत ऑनलाईन सेल्स,नवनवीन ऑफर्स,दिवाळी स्पेशल अमुकतमुक यांचाही समावेश करावा लागेल.आमच्या एका हौशी मित्राने तर दिवाळी स्पेशल रेनकोट-छत्र्यांचे दुकानही टाकले होते.इतकंच काय तर तिचं गाणी,तेच गायक,तेच सभागृह(आणि तेच प्रेक्षकसुद्धा) असलेल्या दिवाळी स्वरमयी पहाटेच्या जाहिराती सुद्धा असा जाणीवेचा चिमटा काढतात.
आम्ही लहान असताना (म्हणजे फराळ खाऊन आपण जाड होणार नाहीत ना याची काळजी नसायचं वय)ही जाणीव जास्त व्हायची. त्याला कारणही तसेच,दिवाळीपूर्वी सहामाही परीक्षेत आपण फोडलेल्या फटाक्यांचे आवाज येणार याची धास्ती वाटायची,काही फटाके आपल्याला हवे तसे वाजत तरी काही फटाक्यांचा आवाज अंगावर एखादा वळ उमटवूनही जायचा. मला किल्ला करण्याची विशेष आवड.दगड-विटा रचून त्यावर चिखलाचा गिलावा करून आजूबाजूला काळी माती टाकायची,त्यात मोहरीच्या बिया टाकल्या कि जंगल तयार व्हायचं. मग महाराजांची,बाजी-तानाजीची मुर्ती त्यावर ठेवली कि जणू त्या शिवकाळाची प्राणप्रतिष्ठा आपल्याच देहात होतीय असा भास व्हायचा. मोठ्या प्रेमाने तयार केलेला तो किल्ला आवरून ठेवणे मला आवडले नाही.ते न करायला जसा माझा जात्याचा आळशीपणा कारणीभूत होता तसाच आपले भावविश्व् स्वतःच मोडून टाकण्याचा तिटकाराही होता.काळाप्रमाणे मी या दोन्ही सवयी बदलल्या हा भाग अलहिदा.
आता दिवाळी जाताना वाटणारी हुरहुर कमी आणि संप मिटला तरी गाड्यांना गर्दी असेल का? फराळ कमी तेलातील होता ना? Jio भाववाढ करेल का? अमेरीका युनेस्कोतुन बाहेर पडल्याचे काय परिणाम होतील? (झालंच तर या ८ नोव्हेंबरला पुन्हा.......) अशा स्वतःच्या कमी आणि जगाच्या अधिक (म्हणजेच पुणेरी) चिंता सतावत असतात.त्यात आलेले फोटोज डिलीट करण्याचा वेगळा त्रास. लोकांनी दिवाळीत फोटो काढण्याचे प्रमाण असेच ठेवले तर फटाक्यांपाठोपाठ सेल्फीवर देखील निर्बंध येतील यात शंका नाही.
एकूणच काय तर आमची दिवाळी किल्ला करण्यापासून हातात असलेले वेगवेगळे Task kill करण्यापर्यंत पोहोचली हा वात न शिलगावताही हळूहळू फुटणारा फटाका अस्वस्थही करतो तशीच थोडी मजाही देतो.©
Sunday, 22 October 2017
दिवाळी के बाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment