खरं तर शहरातील मतदारसंघात कामं आपोआप होतात.आरमोरी-जत सारख्या मतदारसंघातील लोकांना शिक्षण-रस्ते-वीज-आरोग्य-पाणी यांसारख्या मुलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो तो शहरातल्या मतदारसंघाच्या नशिबी नसतो.कसब्याबाबतही हेच आहे.शहरातील दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टींकडे महापालिका लक्ष पुरवते,स्मार्ट-सिटी असल्याने पुण्यात एकच रस्ता अनेक वेळा खणायला आणि परत त्याचे डांबरीकरण करायलादेखील पैसा आहे.मेट्रोचे काम ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाडीच्या गतीने का होईना पण पुढे चाललेले आहे.रस्ते झाडले जातात,कचऱ्याचे ढिग साचत नाहीत.एकुणच काय तर पंचेंद्रियांना इथल्या विकासाचा अनुभव येतो.खासदारकी, आमदारकी, महापालिका एवढ्या सगळ्या सत्ता केंद्रावर भाजपाची मजबूत पकड आहे.तरीही एका लहान पोटनिवडणुकीसाठी दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोनदा पुण्यात येऊन गेले.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तळ ठोकून बसले.स्वतःचा मतदारसंघ नसलेले चंद्रकांत पाटील रासनेंना निवडून द्या म्हणून पायपीट करत होते.१९९५ पासून भाजपचा निर्विवाद गड असलेल्या कसब्यात भाजपाला एवढे परिश्रम घ्यायला लागणं खरं तर भाजपा बॅकफुटवर गेल्याचं लक्षण होतं.
फडणवीसांच्या रोड-शो मध्ये 'अयोध्या तो झांकी हैं,पुण्येश्वर अभी बाकी हैं..'च्या घोषणा दिल्या गेल्या.शेवटी नाही म्हटलं तर शेवटचा प्रयत्न म्हणून हिंदु-मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयोग (आणि त्याला पवारांनी दिलेली साथ ) भाजपाची अस्वस्थता दाखवतंय.२००९ ला बापट आणि मनसेच्या धंगेकर यांच्यात केवळ ८१६४ मतांचं अंतर होतं.काँग्रेसकडून रोहित टिळकांनी ४६००० मतं मिळवली होती,मतविभाजन झालं म्हणून बापट निवडून आले.त्यानंतर दोन्ही निवडणुका भाजपने २५००० च्या फरकाने जिंकल्या आहेत.२०१४ ला मनसेकडून लढताना धंगेकरांना २५९९८ मतं मिळाली होती, काँग्रेसला ३१३२२,राष्ट्रवादीला १५८६५.यावेळी मतविभाजनाची संधी नाही, काँग्रेस-राष्ट्रवादी-उबाठा गट एकत्र आहेत.अशावेळी धंगेकर रासनेंना धुळ चारणार की कसब्यातील भाजपचे 'सुवर्णयुग' रासने कायम ठेवणार हे उद्या स्पष्ट होईलच.
एक नक्की २+२ ची बेरीज करण्यासाठी कॅल्क्युलेटर वापरणाऱ्याला हुशार नक्कीच म्हटलं जात नाही.भाजपची अवस्था काहीशी अशीच आहे.
No comments:
Post a Comment