हि तशी फार पुर्वीची गोष्ट नाही.अगदी आत्ताआत्ताची आहे....
ग्रामीण भागात 'टार-रोड' झालेले नव्हते,पायवाटा-कच्च्या सडका आपला आबा राखून होत्या.बैलाच्या गळ्यातील घुंगरमाळांच्या तालावर बैलगाडी धुळमाती उडवत चालायची.चकाऱ्यांशी सलगी करत छकडा धावायचा कधी खकाना उडवीत एखादा उमदा घोडा चौखूर उधळीत जायचा.चरायला गेलेली गुरं-वासरं मावळतीला धुळमाती अंगाला लेवूनच येत असत.पुढे काळ बदलला,भावक्या कज्जे लढायला 'राजदूत' वरुन जाऊ लागल्या,तालेवार ताडपत्री लावलेल्या 'जीप' मधून रुबाब मारायला लागले गावातली कच्च्या सडका मायबाप सरकारच्या कृपेने पक्क्या व्हायला लागल्या.ट्रॉलीभर ऊस फॅक्टरीला जाऊ लागले गावात मायंदळ पैसा येऊ लागला,शेती सुधारायला लागली,नवे नवे प्रयोग व्हायला लागले.
शहरातल्या माणसांना यातलं काही माहिती नव्हतं,पण त्यांना खेड्यातल्या आयुष्याचं मोप कौतुक.सिनेमा-कादंबऱ्यांनी ते वाढवलेलं.मग ऍग्रो-टुरिजम' सुरू झालं.चुलीवरच्या भाकऱ्या,झुणका,पेरू-चिंचा जोडीला रानातली गार सावली अन अंगावर धूळ उडवीत बैलगाडीतुन चक्कर......!
पण खर्चाची गणितं सगळ्यांनाच जमतात असे नाही,इथं पुणे महानगरपालिका नागरिकांच्या मदतीला येते,म्हणजे कर्ज वैगेरे देऊन नाही बरं,गावभरचा रस्ता खणायचा म्हणजे उडणारी धुळ लोकांना agro tourism ची आठवण करून देईल.उडणारा फुफाटा लोकांना गावात गेल्याचा आनंद मिळतोच शिवाय चौकात चौकात खोदलेला रस्ता सारी खुदाई एक तरफ या पारंपरिकतेलाही छेद देणारा आहे.एकूणच काय तर एका थोर कवीने किती यथार्थ वर्णन केलंय,
"क्यूँ जाए एग्रो-टूरिजम के लिए गांव में,
कुछ दिन तो गुजारिए पुणे मनपा की छाँव में ।"
No comments:
Post a Comment