भीष्मा
स्मरतय तुला,
तुझ्या भीष्मप्रतिज्ञांनी डळमळणारी इंद्रासने,
दिग्विजयासाठी काढलेल्या तुझ्या 'रथयात्रांनी'
कंपित होणारी शत्रुंचे चेहरे,
सत्तेला लाथ मारणाऱ्या तुझ्या निश्चयानंतर 'भीष्मोय' म्हणून गरजणारे ब्रम्हांड..
न्यायआश्वासक असणारा तुझा तो निपक्षपाती (नी धोरणी) आवाज,
आणि सत्य,त्याग आणि संन्यसत्वाचे प्रतिक असणारे तुझे ते शुभ्र राजवस्त्र....
भीष्मा,
याच राजवस्त्राची लक्तर होतात तेव्हा,
जेव्हा द्रौपदी वस्रहरणावेळी तु मौन पाळतोस
हतबल मौन,
दुर्योधनाच्या अपौरुषेय सेनेचा तु होतोस सेनापती,
अन त्याच्या अधर्मी भात्यातुन सोडतोस बाण तुझ्याच लाडक्या पांडवांवर...!
अशावेळी हाती काही येत नाही रे,भीष्मा
उरत केवळ
नावामागच्या श्रद्धेयत्वाचे निस्तेज होत जाणारे अवशेष,
आणि प्रतिज्ञा,धर्म ,न्याय आणि सत्तेच्या द्वंद्वातून जन्मणारी (काळाची ) कठोर शरशय्या...!
No comments:
Post a Comment