प्रीतीसंगमाच्या तटावर
मावळतीला जाणार्या सुर्यनारायणाला
विचारल मी देताना अर्घ्य,
"सत्तेच्या सारीपाटात
कवीमनाच्या सोंगटयांना
असते का काही किंमत?
एकनिष्ठा आणि पावित्र्याच्या
शुभ्रवस्त्रांना
का असतो अवहेलनेचा शाप
सदासर्वकाळ,
राजनीतीच्या क्रूर चौसरात,
नीतीची बोट धरून जाताना
काय उरत मागे शेवटी?
नावामागच्या संन्यस्त ओझ्याशिवाय....."
तेजाळलेल्या सात घोडयाचे लगाम खेचत
किंचीत स्मिताने
रविराज उदगारला...
"उरते ती काळावर उमटवलेली
कर्तृत्वाची तप्तमुद्रा
आणि सहस्त्रक उजळणार
उपभोगशून्य स्वामित्व"
No comments:
Post a Comment