Saturday, 23 January 2016

महानायक

अनंताच्या वाळवंटात,
एका चिरकाल रात्री,
हातात हात घेऊन चालले होते जेव्हा
साक्षात काळ आणि महानायक,
नायकाचा हात हातात घेत,
काळ म्हणाला त्याला,
"बघ,माझ्या सामर्थ्यापुढे हरलास तु शेवटी,
माझ्याच तालावर नाचत,
वाकत,
झुंजत,
झुकवत राहिलो मी तुला,
तुझं जिंकणं,हरणं होत माझ्याशीच संलग्न,
माझीच पाऊले उमटतात इतिहासात खोलवर आणि तुझी ओळखही होते
केवळ माझ्याचमुळे"
त्याचा हात हलकेच दाबत नायक म्हणाला
"तुझ्या अनाभिषक्तत्वाला असतो
अभिशाप चिरंतनाचा,
तुझ्याच छातीला भगदाड पाडून आम्ही रचतो
कर्तृत्वाचे मनोरे,
रचतो इतिहास अश्रू,घाम नी रक्त सिंचून....
आम्ही असतो म्हणून तुझं अस्तित्व...."
अंगावरची शाल सारखी करत,
वाळूत रुतलेली पाऊले पाहिली जेव्हा दोघांनी,
तेव्हा कुठेच नव्हता काळ
उरला होता केवळ महानायक,
काळ आणि महानायक
दोघे इतिहासात केव्हाच एकरूप झाले होते..

No comments:

Post a Comment