Saturday, 9 January 2016

देव

भर थंडीत
डोंगरावरच्या देवळात,
भक्तांच्या जमलेल्या गराड्यात,
देवाला म्हणालो मी,
"हे सर्वशक्तीमान जगनियंत्या,
मी दास आहे तुझा,
कर मला मुक्त माझ्या पापाच्या भारातून"
काहीच उत्तर न देता
देव मख्ख होता.
पुढल्यावेळी दुपारी
लोटांगण घालून चढलो मी डोंगर
हात जोडून,नवसांची लाच देत
पसरला पदर,
"बापा, एवढं मागणं पुरव,
मी पुत्र ना तुझा?
बोल एकदा माझ्याशी"
चेहऱ्यावरची रेषही न हलवता,
देव पुन्हा गप्प होता....

आज संध्याकाळी,
जरा सहजच गेलो
देवाची विचारपूस करावी म्हणून,
आस्तिकांच्या आतिथ्याखाली दबलेला,
त्याचा चेहरा बघवत नव्हता....
ना हात जोडले
ना काही मागितलं त्याच्याकडे,
निघालो तसाच,
डोंगर उतरताना,
आकाशातील ढगांसवे
देव माझ्याशी बोलत होता.

No comments:

Post a Comment